वर्धा : येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे जड वाहनांची तपासणी करण्याकरिता स्वमालकीचा २५० मीटरचा सिमेंट रस्ता नसल्याने काही दिवस तपासणीच्या प्रक्रियेला ब्रेक द्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. यामुळे वर्धेत सध्या जड वाहनांच्या तपासणीवर बुधवारपासून बंदी आहे. ही बंदी सोमवारपर्यंत राहणार असल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले असून जड वाहन मालकांची पंचाईत झाली आहे. वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून जिल्ह्यात जड वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येते. ही तपासणी करण्याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे स्वमालकीचा २५० मीटरचा रस्ता असणे अनिवार्य आहे. तसा रस्ता वर्धा विभागाकडे नाही. वर्धेत पिपरी (मेघे) येथील मैदानावर अशी तपासणी करण्यात येते होती. तिथे जागा कमी पडत असल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सेवाग्राम येथील एमआयडीसी परिसरात या वाहनांची तपासणी सुरू केली होती. ही तपासणी झाल्याशिवाय वाहन रस्त्याने जाणे शक्य नाही. अशी वाहने रस्त्याने धावत असताना त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येते. अशातच बुधवारी अचानक ज्या जिल्ह्यांकडे स्वमालकीचा २५० मीटरचा सिमेंटचा रस्ता नाही अशा जिल्ह्यांनी सोमवारपर्यंत जड वाहनांची तपासणी करू नये, असे आदेश न्यायालयाने दिली. यामुळे जड वाहनांची तपासणी बंद करण्यात आली आहे. जड वाहन मालकांचे सोमवारच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)
जड वाहनांच्या तपासणीला ‘ब्रेक’
By admin | Updated: August 26, 2016 01:59 IST