अदखलपात्र गुन्हा : वादग्रस्त अभियंत्यावर कारवाई होणारआष्टी (शहीद) : खंबीत येथील शेतकरी योगेश धर्माळे यांनी वीज वितरण कंपनी अंतोरा कार्यालयाचे शाखा अभियंता पेठे यांना वीजपुरवठ्याबाबत विचारणा केली असता त्यांनी अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी आष्टी पोलिसांनी पेठे वर अदखलपात्र गुन्हा दाखल केला.याबाबत सविस्तर असे की, खंबीत मौजातील शेताची विद्युत गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे. याप्रकरणी लाईनमन मडावी यांना योगेश धर्माळे यांनी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर देवून वेळ मारून नेली. यानंतर शाखा अभियंता एम. एम. पेठे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी अश्लिल भाषेत शिवीगाळ करून जीवानिशी ठार मारील असा दम भरला. त्यामुळे शेतकरी योगेश यांनी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केली. यावरून पेठे वर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. अभियंता पेठे गेल्या दोन वर्षांपासून वादग्रस्त ठरत आहे. कार्यालयात गैरहजर राहणे, शेतकऱ्यांना शिवीगाळ करणे, कंत्राटदारांना पैशासाठी तगादा लावणे, वीज बील भरल्यावर वीजपुरवठा खंडित करणे, शेतीच्या वीजपंपाचे अर्ज प्रलंबित ठेवणे, वारंवार कार्यालयाला कुलूप लावणे असे प्रकार वारंवार करीत असल्याच्या तक्रारी आहेत. याप्रकरणी आमदार अमर काळे, कार्यकारी अभियंता निलेश गायकवाड यांना निवेदनाद्वारे निलंबनाची मागणी केली.(प्रतिनिधी)
शाखा अभियंत्याची शेतकऱ्याला शिवीगाळ
By admin | Updated: August 27, 2015 02:21 IST