समुद्रपूर : चेन्नई येथून नागपूरला दोन लीफ्ट घेवून जात असलेल्या ट्रकचालकाला मारहाण करून दोन लिफ्टसह ट्रक लांबविल्याची घटना शेडगाव येथे घडल्याची तक्रार शुक्रवारी समुद्रपूर पोलिसात करण्यात आली होती. यात ट्रकसह १६ लाखांचा माल लंपास करण्यात आला होता. या चोरीचा समुद्रपूर पोलिसांनी २४ तासात छडा लावीत शनिवारी नागपूर येथून दोघांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून चोरीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई येथून दादा अक्षय ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक क्र. एमएच ३५ के ७९६ हा १० लाख रुपये किमतीच्या दोन नग लीफ्ट घेवून नागपूर निघाला होता. प्रवासादरम्यान अतुल नामक व्यक्तीने ट्रक चालकाच्या फोनवर बोलून जामला माल उतरवायाचा आहे, असे सांगून त्याला ट्रक थांबवायला सांगितले. ट्रक शेडगाव जवळ थांबल्यानंतर ट्रकचालक अरुण राघोबा गाते (४५) रा. विहरिगाव याला माल कुठे उतरवायचा आहे, ती जागा दाखवतो म्हणून दूचाकीवर बसवून नेत मारहाण करून तिथेच सोडले. या दोघांनी परत येवून ट्रक लंपास केला. घटनेची तक्रार ट्रक चालकाने ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी दाखल केली. तक्रार येताच ठाणेदार अनिल जिट्टावार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासचक्रे फिरवीत २४ तासात आरोपींना अटक केली. यात अमजदखॉँ आरिफखॉँ (३२) रा. बडाताजबाग जि. नागपूर व मोहम्मद एकाज मोहम्मद जमसिद (२१) रा. गिट्टीखदान जि. नागपूर या दोघांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, हिंगणघाटचे एसडीपीओ पाली यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अनिल जिट्टावार, उमेश हरणखेडे, चांगदेव बुरंगे, राजकूमार कुंवर, अजय घुसे, सुरेश मडावी, अनील राऊत, रवी वानखेडे, राहुल गिरडे, अमोल खाडे, राजेंद्र जयंसिंपुरे यांनी केली. आरोपींना न्यायालयात हजर केल असून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी)
ट्रकसह लिफ्ट लांबविणारे दोघे अटकेत
By admin | Updated: February 7, 2015 23:29 IST