लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : टेलीव्हिजन, सोशलमिडीया आदींच्या वाढत्या प्रभावामुळे शाळकरी मुलांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तक वाचण्याची आवड कमी होत चालली आहे. पुस्तक वाचण्याची संस्कृती कायम टिकवून राहावी यासाठी पुस्तकदोस्ती उपक्रमाच्या माध्यमातून प्रा. सचिन सावरकर गत १० वर्षापासून पुस्तक नि:शुल्क वाटण्याचा उपक्रम करीत आहे. यंदा त्यांनी दिवाळीनिमित्त दहा हजार विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली असून त्यांच्या धडपडीला यश आले आहे.पुस्तक दोस्ती दिवाळी या उपक्रमांतर्गत १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत संत साहित्याचे, देशभक्त नेत्यांचे जीवन चरित्र असलेले पुस्तक वाटण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. हे यश पुस्तकदोस्ती उपक्रमातून प्राप्त झाले असल्याचे या उपक्रमाचे शिल्पकार प्रा. सचिन सावरकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. बालकांमध्ये पुस्तक वाचण्याची आवड वाढावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आला. वर्षभर विविध कार्यक्रमाचे औचित्य साधून पुस्तक वाटण्याचे काम शहरी व ग्रामीण भागात करण्यात येते. दिवाळी सणाचे निमित्त साधून पालकांना व विद्यार्थ्यांना पुस्तक देण्यात आले. नि:शुल्क स्वरूपात हे पुस्तक सचिन सावरकर, महेश किरंगे, गणेश चंदनखेडे, अविनाश दखणे, किरण भानारकर, साक्षी पाटील, शीतल सावरकर या कार्यकर्त्यांनी वितरित केले. जिल्ह्यातील दहा हजारावर अधिक विद्यार्थी पुस्तकदोस्ती उपक्रमाशी जुळले आहे. त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी कार्यशाळा घेवून मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांमधील टि.व्ही. व मोबाईल पाहण्याचे प्रमाण कमी होत आहे. नि:शुल्क स्वरूपात हे पुस्तके व मार्गदर्शन पुस्तकदोस्ती उपक्रमाचे कार्यकर्ते करीत असल्याचे प्रा. सावरकर यांचे म्हणणे आहे. दिवाळीच्या काळात अनेक कुटुंबियांच्या भेटी घेवून त्यांना शास्त्रज्ञ, कलावंत, प्रतिभावंत लेखक व संतांनी लिहिलेल्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले, असेही प्रा. सचिन सावरकर यांनी सांगितले.
१० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली पुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 23:15 IST
टेलीव्हिजन, सोशलमिडीया आदींच्या वाढत्या प्रभावामुळे शाळकरी मुलांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तक वाचण्याची आवड कमी होत चालली आहे.
१० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली पुस्तके
ठळक मुद्देपुस्तकदोस्ती संकल्पनेचा उपक्रम : सचिन सावरकर यांच्या धडपडीचे यश