हत्येचा संशय : ताराने लावलेल्या गळफासामुळे शंकावर्धा : कडुलिंबाच्या झाडाला गळफास लावून असलेला अनोळखी इसमाचा मृतदेह नागठाणा शिवारात आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या मृतकाच्या अंगावर शर्ट नाही, शिवाय त्याने ताराने गळफास लावला असल्याने ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा कयास लावण्यात येत आहे. ही घटना गुरुवारी दुपारी उघड झाली.नागठाणा शिवारात असलेल्या वनविभागाच्या आरक्षित जागेत एका इसमाचा मृतदेह झाडाला बांधून असल्याची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळ गाठले. येथे त्यांनी शोध घेतला असता झाडाला मृतदेह अटकून असल्याचे दिसून आले. मृतदेहाची पाहणी केली असता त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून तपासाअंती काय ते सत्य समोर येईल, असे सांगण्यात आले आहे. नागठाणा शिवारात हत्या झाल्याची माहिती पोलिसांना बुधवारी सायंकाळीच मिळाली. यावरून सेवाग्राम पोलिसांनी नागठाणा शिवाराचा संपूर्ण परिसर पिंजून काढला; मात्र अंधार होईपर्यंत त्यांच्या हाती काहीच आले नाही. यामुळे गुरुवारी सकाळपासून सेवाग्राम पोलिसांकडून शोध मोहीम सुरू झाली. यात नागठाणा शिवारात वनविभागाच्या झुडपी जंगलात एका झाडाला मृतदेह अडकून असल्याचे दिसले. पोलिसांनी पंचनामा करून मतृदेह उत्तरीय तपासणीकरिता सेवाग्राम रुग्णालयात पाठविला आहे. (प्रतिनिधी) अन् मृतकालाच विचारला मृतदेहाचा पत्ता सेवाग्राम पोलीस मृतदेहाच्या शोधात नागठाणा शिवारात आले असता झाडाखाली एक व्यक्ती उभा असल्याचे दिसला. यावरून एका कर्मचाऱ्याने त्याला इथे कुठे मृतदेह दिसला काय, असे विचारले. सदर व्यक्तीने कुठलीच हालचाल केली नसल्याने जवळ जावून पाहता आपण मृतदेहालाच पत्ता विचारल्याचे त्यांच्या लक्षात आले.
नागठाणा शिवारात मृतदेहाने खळबळ
By admin | Updated: December 11, 2015 02:37 IST