वायगाव (निपाणी) : नवी इमारत बांधण्याकरिता जुनी जिर्ण झालेली इमारत पाडण्यात आली. मात्र नवी इमारत बांधण्यात आली नाही. परिणामी याच जुन्या पडक्या इमारतीत येथील चिमुकल्यांना शिक्षण घ्याने जागत आहे. शाळेच्या या पडक्या इमारतील गवताचा विळखा बसला असून यातून रस्ता काढताना विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका उद्भवण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना सुसज्ज इमारत देण्याकरिता सर्व शिक्षा अभियानांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला. या अंतर्गत येथील कन्या शाळेची जिर्ण झालेली इमारत पाडण्यात आली. इमारत पाडण्याला आता दोन ते दीड वर्षांचा कालावधी झाला. मात्र तिच्या बांधकामाकडे कुणाचेही लक्ष नाही. आता सर्वशिक्षा अभियान बंद होत असल्याची माहिती बाहेर येत आहे. यामुळे या इमारतीचे बांधकाम होईल अथवा नाही या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या पडक्या इमारतीत पहिली ते चवथी पर्यंत वर्ग भरत आहे. येथे एका वर्गात दोन वर्ग भरत असल्याने शिक्षकांनाही विद्यादान करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वर्ग भरतात त्या जागेला गवताने विळखा घातलेला आहे़ शिवाय घाणही साचली आहे. या गवतातून चिमुकल्यांना वर्गात जावे लागत आहे. यात त्यांच्या जीवितास धोका उद्भवत आहे. अशी ओरड पालक करीत आहेत. त्यांच्या या मागणीकडे जिल्ह्याच्या शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. येथे असलेल्या घाणीमुळे चिमुकल्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. शिवाय या वाढलेल्या गवतामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचाही धोका उद्भवत आहे. या वातावरणामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. याकडे शिक्षण विभागाच्यावतीने लक्ष देण्याची गरज आहे.(वार्ताहर)
जि.प.च्या कन्या शाळेला गवताचा विळखा
By admin | Updated: October 16, 2014 23:29 IST