तपासासाठी पोलीस देवळीतील शेतातवर्धा : येथील रूपेश हिरामण मुळे नरबळी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना गजाआड केले. आरोपींना अटक करण्याच्या कारवाईनंतर आता या प्रकरणात वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. यात मंगळवारी पोलिसांनी आरोपीकडून रक्ताने माखलेले कपडे, त्याचा आॅटो व रूपेशचे अवयव कापण्याकरिता वापरलेले ब्लेड जप्त केले आहे. या प्रकरणादरम्यान गुप्तधन शोधण्याकरिता संपर्क साधणाऱ्या पाचही आरोपींना घेवून देवळी येथील शेतात रवाना झाले आहेत.रूपेशचा नरबळी झाल्याचा खुलासा होताच पोलिसांनीही या प्रकरणातील अन्य आरोपींना अटक करण्याकरिता पोलिसांची चमू कार्यरत आहे. गुप्तधन शोधण्याकरिता मुख्य आरोपी आसिफ याच्याशी संपर्क साधणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांना अधिक तपासाकरिता आज शहर पोलिसांच्या चमूने या आरोपींना घेवून देवळी येथील शेत गाठले. यात सायंकाळपर्यंत तपासाकरिता गेलेले पोलीस परत आले नसल्याने यात काय सापडले याची माहिती मिळू शकले नाही. दरम्यान पोलिसांनी आसिफ याने रूपेशची हत्या करताना वापरलेले साहित्य जप्त केले. यात रूपेशला पळवून नेण्याकरिता वापरण्यात आलेला आसिफचा एम एच ३२ सी ८९२३ क्रमांकाचा आॅटो, अवयव कापण्याकरिता वापरण्यात आलेल ब्लेड, त्याचे अवयव नेण्याकरिता वापरण्यात आलेली चादर व रक्ताचे डाग असलेले आसिफचे कपडे जप्त करण्यात आले आहे. आसिफ मूळचा यवतमाळ येथील सावर गावाचा असल्याने तेथेही जिल्ह्यातील पोलीस तपासाकरिता जाणार असल्याची माहिती आहे. सध्या या प्रकरणात जिल्ह्यातील आणखी काही जण सहभागी असल्याच्या माहितीनुसार तपास सुरू आहे. हा पूर्ण होताच जिल्ह्याच्या बाहेर तपास सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यात आणखी आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
रूपेशचे अवयव कापण्याकरिता वापरलेले ब्लेड जप्त
By admin | Updated: November 18, 2014 23:00 IST