वर्धा : आष्टी (शहीद) व सिंदी (रेल्वे) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांकरिता रविवारी झालेल्या मतदानची सोमवारी मोजणी झाली. यात आष्टी येथे सत्ताबदल करीत भाजपाने झेंडा रोवला आहे. सिंदीत मात्र त्यांना भोपळाही फोडता आला नाही. येथे एकत्र आलेल्या त्रिकुटाने स्थापन केलेल्या एकता शेतकरी विकास आघाडीने सत्ता स्थापन केली. आष्टीतील सत्ता व सेलूतील पारंपरिक विरोधकांचे झालेले मनोमिलन नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरणार असल्याची चर्चा आहे. आष्टी बाजार समितीत १८ जागांपैकी १५ जागांवर भाजपने ताबा मिळविला. तर काँग्रेसला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. आर्वी बाजार समिती हातून गेल्याने भाजपाचे माजी आमदार दादाराव केचे यांनी आष्टीत सत्ता मिळविण्याकरिता विशेष परिश्रम घेतल्याची तर काँग्रेसला आमदार अमर काळे यांचा फाजिल आत्मविश्वास नडल्याची चर्चा आहे. त्यांनी निवडणुकीच्या काळात एका विशिष्ट समाजाला डावलल्याने ही अवस्था झाल्याचे बोलेल जात आहे. यामुळे गत काही काळांपासून असलेली काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली. सिंदी (रेल्वे) येथील निवडणुकीत काँगे्रसच्या गटाने एकता शेतकरी विकास आघाडी निर्माण करून निवडणूक लढविली. यात जिल्ह्याचे सहकार नेते माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, जि.प.चे माजी अध्यक्ष विजय जयस्वाल, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे एकत्र आले होते. या तिनही पारंपरिक विरोधकांच्या मनोमिलनामुळे या बाजार समितीतील सर्वच जागांवर त्यांनी एकतर्फी विजय मिळवित समितीवर ताबा कायम केला. बाजार समितीच्या निवडणुकीत प्रथमच विरोधात आलेल्या भाजपा आघाडीला एकही जागा मिळविता आली नाही. या बाजार समितीवर आपली सत्ता असावी याकरिता आ. पंकज भोयर व येळाकेळी सर्कलचे जि.प. सदस्य राणा रणनवरे यांनी धुरा सांभाळली होती. मात्र त्यांना एकही जागा मिळविता आली नाही. सेलूत पत्रकार व शेतकरी संघाची भूमिका निर्णायक४या निवडणुकीत पहिल्यांदाच उमेदवार उभ्या करणाऱ्या पत्रकार व शेतकरी संघाची भूमिका निर्णायक ठरली. त्यांच्यावतीने उभ्या करण्यात आलेल्या उमेदवारांनी घेतलेली मते ही भाजपच्या उमेदवारांची असल्याची चर्चा जोरात होती. या संघाने जर उमेदवार उभे केले नसते तर भाजपला काही जागांवर ताबा मिळविता आला असता, अशी चर्चा आहे. ४जिल्ह्यात भाजपाचे वाढलेले वर्चस्व रोखण्यासाठी या निवडणुकीत परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या गटाने आघाडी करून ही निवडणूक लढविली. यात त्यांना यश आल्याने झालेले मनोमिलन येत्या सर्वच निवडणुकीत पहावयास मिळेल, अशी चर्चा निकालानंतर सिंदी समितीच्या परिसरात होती.
भाजपची आष्टीत बल्लेबल्ले तर सेलूत भोपळा
By admin | Updated: August 4, 2015 01:48 IST