वर्धा : उन्हाळ्याच्या दिवसात पूर्वी गर्द हिरव्या झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट सकाळ-दुपार-सायंकाळी ऐकू यायचा. गावातील पहाटच रंगीबेरंगी पक्ष्यांच्या किलबिलाटाने होत असे. घराबाहेर डोकावले तरी पक्ष्यांचे मनमोहक थवे दृष्टीस पडत होते. मात्र अलिकडे वाढत्या प्रदूषणाने आणि मानवी हस्तेक्षेपामुळे पक्ष्यांचे थवे दिसेनासे झाले आहे. काही दिवसात अनेक पक्षी केवळ पुस्तकातूनच दिसेल की काय, अशी अवस्था आली आहे.शहरी आणि ग्रामीण भागात काही वर्षापूर्वी पक्ष्यांची संख्या ही बरीच होती. शहरांमध्येही वडाच्या अथवा उंच पिंपळाच्या वृक्षांवर पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसायचे. सायंकाळी या पक्षांचा किलबिलाट सुरू असायचा. पोपट, बगळे, राघू आदी पक्षी या वृक्षांवरच मुक्काम ठोकायचे. तांबडं फुटायच्या वेळेस पक्ष्यांचे थवे चाऱ्याच्या शोधात निघताना पुन्हा किलबिलाट व्हायचा सर्वांच्या आवडीची चिमणी घरभर चिवचिव करायची कवेलूंच्या घरात सर्वत्र तिची घरटी असायची. परंतु सिमेंटच्या जंगलात चिमण्यांची घरटीही दिसेनासी झाली आहे.मोबाईल टॉवरमुळे शहरातील पक्षी शहरी भागातील दूर जात आहेत, तर गावांकडे शेतात फवारण्यात येणाऱ्या कीटकनाशकांमुळे पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहे. कावळा आता पिंडाला शिवायलाही दिसत नाही. वैज्ञानिक क्रांतीने जग बदलले आहे. निसर्गापासून माणूस दूर जाऊन काँक्रीटच्या जंगलात राहू लागला आहे. नवनवीन संशोधन करताना निसर्गाला मानव धारेवर धरत असल्याने सृष्टीचे चक्र विस्कळीत होत आहे. त्यातच शहरामध्ये प्रदूषणाची समस्या वाढली आहे. याची झळ ग्रामीण भागालाही पोहोचली आहे. त्यामुळे पाणीही प्रदूषित होत असून पक्ष्यांसाठी ते धोक्याचे ठरत आहे. निसर्गाचा सफाई कामगार असणारा गिधाड हा पक्षी तर नामशेषच झाला आहे. त्यामुळे जनावरांची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न निर्माण होतो. कावळा, चिमणी, पोपट, हरियाल यासह असंख्य प्रजातीच्या पक्ष्यांचे नैसर्गिक आश्रयस्थाने असलेली झाडे तोडल्या जात आहे. त्यामुळे नेहमी नजरेस पडणारे पक्षांचे थवे आता खूपच कमी ठिकाणी पहावयास मिळतात. आधी गावात दिवसाची सुरूवातच पक्ष्यांच्या किलबिलाटाने व्हायची. मावळतीला पक्षांचे थवे लाल आकाशात विहार करायचे. आता मात्र हे चित्र तुरळकच दिसते.(शहर प्रतिनिधी)
पक्ष्यांचा पहाटेचा किलबिलाट हरविला
By admin | Updated: May 16, 2015 02:13 IST