वर्धा : वाघांचा अधिवास असलेली वने नेहमीच पर्यटकांचे आकर्षण ठरतात. केवळ वाघच आकर्षणाचे प्रतिक का ठरावेत. वाघांबरोबरच बिबट, अस्वल, रानकुत्री, तडस, लांडगे यांच्यासारख्या सस्तन प्राण्यांच्या प्रजातीपासून ते विविध रंगी फुलपाखरे, कीटक पक्षी सुद्धा तितकेच मनमोहक असतात. याच प्राण्यांसह विविध वृक्ष, वनस्पतीसारख्या जैवविविधतेने नटलेले बोर व्याघ्र अनेकांचे आकर्षण ठरत आहेत. या व्याघ्र प्रकल्पात वर्षात तीन रंग बदलणारे, अंधाऱ्या रात्री एक सुंदर नृतिकेप्रमाणे हावभाव करणारी करूचे झाड (घोस्ट ट्री) आहे. कडाक्याच्या उन्हातही हिरवेगार दिसणारे कुसुमाचे झाड आहे. स्क्रुच्या आकाराच्या शेंगा असणारे, मुरूडशेंग, महादेवाच्या पिंडीवर वाहतात ते बेलाचे झाड, मगरीप्रमाणे असणारे ऐनाचे झाड, सुंदर चवीची फळे धारण करणारे टेंभराचे, चाराचे झाड, असे एक ना अनेक विविध वैशिष्ट्य प्राप्त झाडे तितकीच आकर्षक ठरतात.उंच सखल डोंगर रांगा.... त्यामधून निघणारे गुळगुळीत दगड गोट्यांचे नाले, नाल्यामधून पळताना दिसणारे मुंगुस, अर्जुनाच्या झाडावर बसून आढळणारा तुरा असलेला गरूड, गाडीच्या आवाजाने पळणारे हरिणाचे कळप, वेगवान पळणाऱ्या नीलगायी, मोठ्या जलाशयापाशी आढणारे पक्षी, नजर चुकवून जाणारा बिबट, अचानक होणाऱ्या आवाजाने गांगरलेली अस्वलं. शिकारी षडयंत्र रचून बसणाऱ्या रानकुत्र्यांचा जमाव, पावलोपावली दिसणारे मोर, जंगली कोंबड्या जंगल बुश, झाडांच्या खोडात लपणारे घुबड अशी ही पर्यटकांच्या जैवविविधता वाघाच्या दर्शनाइतकीच महत्वाची आहे. जंगलात येणारे अनेक पर्यटक जवळजवळ वाघाच्या दर्शनासाठी येतात. एकदा जंगलात भ्रमंतीसाठी निघाल्यावर वाघ आपल्याला कोणत्या पाणवठ्यावर, नाल्यात, झाडाखाली, विश्रांती घेताना कोणत्या अवस्थेत दर्शन देईल हिच एक आस असते. पर्यटक वनांचा आनंद दिवसाढवळ्या घेतात; परंतु जंगलांचे रात्रीचे सौदर्यही अप्रतिम आहे. बोर व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधतेचे संवर्धन होण्याकरिता वनाधिकारी रात्रंदिवस गस्त घालत असतात. अवैध वृक्षतोड, चटाई, वन्यजीव शिकार यापासून डोळ्यात तेल घालून जंगलाचे रक्षणही करण्यात येते. जाणूनबुजून लावणाऱ्या आगीपासून जंगल वाचवण्याचा प्रयत्न त्यांच्यावतीने होतो. (प्रतिनिधी)
जैवविविधतेने नटलेला बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना खुणावतोय
By admin | Updated: May 22, 2015 02:20 IST