मेंदूला अतिरक्तस्त्राव : उपचारास नेताना वाटेतच मृत्यूआष्टी (श.) : तळेगाव-आष्टी राज्यमार्ग २४४ वरील खड्ड्यातून दुचाकी उसळल्याने अपघात झाला. यात १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव आकाश धांदे असे असून तो येथील गजानन प्रिंटिंग प्रेसचे संचालक सतीश धांदे यांचा मुलगा आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.आकाश काही कामानिमित्त घरून दुचाकी घेऊन बसस्थानकाकडून जुन्या मंगळवारपुरा वस्तीत जात होता. दुचाकी नकळत खड्ड्यात आदळली. आकाश त्या खड्ड्यात पडला. त्याच्या मेंदूच्या डाव्या बाजूला गिट्टीचा जबर मार बसला बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडून राहिला. काही वेळांनी ही बाब प्रमोद चरडे यांच्या लक्षात येताच त्यांनी आकाशला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. यावेळी त्याच्या मेंदूतून अतिरक्तस्त्राव सुरू होता. तोंड, नाक व कानातून रक्ताच्या धारा लागल्या होत्या. दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठीची बँडेज पट्टी, इंजेक्शन व औषध उपलब्ध नव्हते. यामुळे संतप्त नागरिकांनी डॉ. एस.एस. रंगारी यांना धारेवर धरले. आकाशला गंभीर अवस्थेत नागपूरला उपचारासाठी हलविले. मात्र नागपूरात पोहचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूची वार्ता रात्री ११ वाजता आष्टीत पोहचताच सर्व नागरिकांनी बाजारात गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
दुचाकीला अपघात; युवक ठार
By admin | Updated: November 4, 2014 22:44 IST