३० वर्षांपासून वास्तव्य : शासनाचे वेधले लक्षघोराड : शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत घोराड येथील १८ व्यक्तींना घरकूल मंजूर करण्यात आले. मात्र त्यांचेजवळ स्वमालकीचे भूखंड नसल्याने त्यांच्यावर या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. येथील गावठाणावर बेघरांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. गत ३० वर्षापासून ते येथे वास्तव्यास आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतने रस्ते, नाल्या, पथदिवे, नळयोजना अशा सुविधा पुरविल्या आहे. मात्र त्यांना पक्के घर नाही. इंदिरा आवास योजनेत घरे मंजूर केली. मात्र स्वमालकीचा भूखंड असणे अनिवार्य असल्याने हे लाभार्थी वंचित राहिले. ग्रामपंचायतने ठराव घेऊन या १८ व्यक्तींना घरकुलाच्या लाभासाठी शासकीय भूखंड देण्याची मागणी केली आहे. या मागणीचे पत्र उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. यानंतर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने यादीत नावे असलेल्या लाभार्थ्यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले. घरकुलापासून वंचित ठेवू नये, ज्या जागेवर आम्ही राहतो ती जागा भूखंड म्हणून मिळावी, अशी मागणी केली. जिल्हा परिषदने २७ फेबु्रवारी २०१५ मध्ये घेतलेल्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यातील आनेक ग्रा.पं.मध्ये शासकीय जागा उपलब्ध केली आहे. त्यामधुन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन द्यावी, असा ठराव मंजूर केला. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी या ठरावाच्या पाठपुराव्याकरिता तसे पत्र संबंधितांना पाठविले. या पत्राची प्रत निवेदनासह जोडण्यात आली. शासन यावर कोणती कार्यवाही करेल याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे. निवेदन देताना ग्रा.पं. सदस्य ईश्वर धुर्वे, महेंद्र माहुरे, राजू उईके, राजू पंधराम उपस्थित होते.(वार्ताहर)
भूखंडाअभावी लाभार्थी घरकुलापासून वंचित
By admin | Updated: May 28, 2016 02:12 IST