वर्धा : येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीवर असलेल्या मोहळातील मधमाशा अचानक उडाल्या. माशा आवारात घोंगावत असल्याने न्यायालयात आलेल्या पक्षकारांसह, वकिल व पोलीस कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. या धावपळीत अनेकजण पडले, काहींना माशांचा दंश झाला. गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. सुदैवाने कुणालाही गंभीर इजा झाली नाही. न्यायालय परिसरात कामकाज सुरू असताना सर्वत्र शांतता पसरली होती. तशीही येथे शांतता हा नियमच आहे. सर्व आपापल्या कामात व्यस्त असताना अचानक कुणाच्या ध्यानी मनी नसताना येथील नव्या इमारतीवर असलेले मधमाशांचे मोहळ उडाले, अन् साऱ्यांची धावपळ सुरू झाली. न्यायालयाच्या इमारतीसह परिसरात माशा घोंगावू लागल्या. माशा आपल्यावर हल्ला चढवतील या भीतीपोटी सारेच सैरावैरा पळू लागले. आरोपी घेवून आलेले पोलीस कर्मचारी आरोपींना सोडून स्वत:ला सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात होते. तर दोरखंडाने एकमेकांना बांधून असलेले आरोपीही बचावाकरिता धावपळ करीत होते. हाताला दोर असल्याने त्यांची पडापड होत होती. मधमाशा उडताच त्यांनी इमारतीत प्रवेश केला. याचा फटका कर्मचाऱ्यांसह आपापल्या न्यायालयात कामात व्यस्त असलेल्या न्यायाधीशांनाही बसला. माशांचा हल्ला होताच कोणाला काय करावे काय नाही हेच सूचत नव्हते. सारेच सैरावैरा पळत होते. सुदैवाने यात कुणालाही गंभीर इजा झाल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.(प्रतिनिधी)
न्यायालय परिसरात मधमाशांचा हल्ला
By admin | Updated: March 20, 2015 01:42 IST