आगरगाव : वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभाराचा परिसरातील ग्राहकांना फटका सहन करावा लागत आहे. येथील पारधी बेडा परिसरात खुलेआम वीज चोरी केली जाते. असे असताना यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांत याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.आगरगावनजीक असलेल्या पारधी बेडा या वसाहतीतील ग्राहक वीज तारांवर कडी टाकून चोरी करतात. विजेचे कोणतेही कनेक्शन न घेता वापर सुरू आहे. याचा फटका आगरगाव येथील ग्राहकांना सहन करावा लागतो. यात काही ग्राहकांवर अतिरिक्त देयकाचा बोजा असतो तर कधी वारंवार वीजपुरवठा खंडित होणे या समस्यांचा सामना करावा लागतो. येथील नागरिकांनी सततच्या त्रासाला कंटाळून याबाबत वीज वितरण विभागाकडे तक्रार दिली. या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर तारांमध्ये अडकविलेल्या कडा काढण्यात आल्या. मात्र कारवाईला पंधरा दिवसांचा कालावधी लोटत नाही तोच येथे पुन्हा वीज चोरीचे सत्र सुरू झाले आहे. विजेची चोरी होत असल्याने वीज पुरवठा खंडित केला जातो. उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना उकाडा सहन करावा लागतो. विभागातील अभियंता यांच्याकडे तक्रार देण्यात आली मात्र कोणतीच कारवाई झाली नाही. या वीज चोरीला अभय देण्यात आल्याबद्दल नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.(वार्ताहर)
बेड्यावर होतेय खुलेआम वीज चोरी
By admin | Updated: April 30, 2015 02:02 IST