चंद्रपूर येथे अपघात : तीन ठार तर सात जण जखमीसेलू : साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून परत येत असताना चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अपघातात सेलू तालुक्यातील दोघे तर वर्धा तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले आहेत. या घटनेची वार्ता धडकताच सेलू तालुक्यावर शोककळा पसरली. तालुक्यातील वडगाव येथील मुरलीधर लटारे यांच्या मुलाच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमानिमित्त नातलगासह संपूर्ण परिवार चिंचोली ता. मुल जि. चंद्रपूर येथे शुक्रवारी (दि.१९) गेले होते. साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सर्वच जण एम.एच.३१ सीव्ही. ७५०५ क्रमांकाच्या गाडीने परत गावाकडे निघाले. परतीच्या प्रवासात चंद्रपूरच्या दिशेने जात असताना मुलपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या जानाडा गावाजवळ जीप ओव्हरटेक करताना ट्रॅव्हल्स क्र.एम.एच.३४ ए.बी. ८१३८ वर जावून आदळली. या भयंकर अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झालेत. मृतकांमध्ये गाडीचा चालक शेषराव कोल्हे (३०) रा. रेहकी, गुणवंता बापूराव शेटे (३८) रा. येळाकेळी व राममराव दुधबडे (५८) रा. वर्धा यांचा समावेश आहे. अपघातानंतर सर्व जखमींना मुल येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मृतांपैकी गुणवंता शेटे यांचा अपघातस्थळी मृत्यू झाला तर दोघांना उपचारादरम्यान मृत घोषित केले. घटना कळताच गावात पाहोचताच शोककळा पसरली.(तालुका प्रतिनिधी)
अपघातामुळे तालुक्यावर शोककळा
By admin | Updated: December 20, 2014 22:43 IST