आष्टी (श़) : पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सी.टी. येवला यांचा दोन महिन्यांपासून मनमानी कारभार सुरू आहे. त्यांच्या बेताल व अनागोंदी कारभारामुळे ग्रामसेवक त्रस्त झाले आहेत़ बीडीओंवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे़ याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनही सादर करण्यात आले़गटविकास अधिकारी मुख्यालयी राहत नाही. तळेगाव येथे भाडेतत्वावर खोली करून करून राहतात. तेथे ग्रामसेवकांना बोलवून जेवण तयार करायला सांगतात़ पंचायत समितीमध्ये दिवसभर गैरहजर राहून दौऱ्यावर असल्याचे सांगत कामकाजाकडे दुर्लक्ष करतात. ग्रा़पं़ व पं़स़ स्तरावरील विकासकामे झाल्यावर स्वाक्षरीसाठी पाच टक्के कमीशन मागतात. ग्रामसेवकांनी पैसे दिले नाही तर स्वाक्षरी करण्यास नकार देतात. त्यांच्यासाठी पैसे गोळा करताना तळेगाव येथील ग्रामविकास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्याचा आरोपही ग्रामसेवकांनी केला आहे. पर्यावरण ग्राम संतुलित समृद्ध योजना, मनरेगा अंतर्गत वृक्षलागवडीसाठी आलेल्या खर्चाचे धनादेश काढायला बीडीओ आक्षेप घेत आहे. ग्रामसेवक कर्जबाजारी झाल्याने उसनवारीचा पैसा कुठून फेडायचा, असा प्रश्न ग्रामसेवकांनी केला आहे. तालुक्यातील शेतकरी ताडपत्री, पाईप, इंजीन अनुदानावर घेण्यासाठी पं़स़ मध्ये आल्यावर त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो़ यामुळे लाभाच्या योजनांवर बीडीओ येवला यांचे अर्थपूर्ण व्यवहार त्रासदायक ठरत आहेत़ या सर्व प्रकारामुळे कर्मचारी, ग्रामसेवक त्रस्त झाले आहेत़ याप्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी यांना निवेदन देण्यात आले आहे़ विभागीय चौकशी करून बीडीओंना निलंबीत करा, अशी मागणी ग्रामसेवकांनी केली आहे.(प्रतिनिधी)
बीडीओच्या मनमानीने ग्रामसेवक त्रस्त
By admin | Updated: December 4, 2014 23:15 IST