हिंगणघाट : येथील कारंजा चौकस्थित बँक आॅफ इंडियाच्या शाखेतील आर्थिक व्यवहार मंगळवार पासून ठप्प झाले आहे. परिणामी ग्राहकांना व्यवहार करता आले नाही. याचा नाहक ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील बँकेचे व्यवस्थापक यांनी सहा दिवसांपासून लिंक असल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याची माहिती दिली. नागपूर येथील विभागीय कार्यालयात याबाबत माहिती देऊनही काहीच उपाययोजना करण्यात न आल्याने बँकेच्या नाकर्तेपणाचा ग्राहकांना फटका बसत आहे. सतत सहा दिवसांपासून ग्राहकांची बँकेत गर्दी पहायला मिळत आहे. खातेदार शेतकरी, व्यावसायिक, ठेकेदार, नोकरदार मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करतात. यासोबतच लग्नाचा हंगाम असल्यामुळे ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी असते. मात्र मंगळवारपासून लिंक फेल झाल्यामुळे बँकेत कोणत्याच प्रकारचे व्यवहार होत नाही. यामुळे ग्राहक येथील मेटाकुटीला आले आहेत. लगतच्या बँक आॅफ इंडियाच्या जाम, वडनेर, समुद्रपूर, अल्लीपूर शाखेत लिंक योग्य असून तेथील व्यवहार सुरळीत आहेत. मात्र हिंगणघाट शाखेत खाते असलेल्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ग्राहकांनाा १० किलोमीटर अंतरावरील जाम शाखेत आर्थिक व्यवहाराकरिता पाठविले जात आहे. मात्र तेथूनही केवळ ५० हजार रुपयांपर्यंत व्यवहार होत आहेत. परिणामी, अनेक ग्राहक अडचणीत सापडले आहेत. हिंगणघाट शाखेतून योग्य व नियमित सेवा मिळत नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. गॅस अनुदानाबाबतही अनेक वादग्रस्त प्रकरण अनेकदा समोर आले आहे. याबाबत बँकेचे व्यवस्थापक आय. आर. गिरडकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले, लिंक फेल झाल्याची माहिती हिंगणघाट शाखेतर्फे नागपूरच्या विभागीय कार्यालयाला देण्यात आली आहे. मात्र संबंधित अभियंत्याला अद्याप पाठविण्यात आलेले नाही. तांत्रिक बिघाड पूर्णपणे दुरुस्त होईपर्यंत लिंक सुरु होणे शक्य नाही. याकरिता नागपूरचे विभागीय कार्यालयच जबाबदार आहे, असे सांगितले. यासर्व प्रकारात मात्र ग्राहकांची नाहक कुचंबना होत आहे. हा तांत्रिक बिघाड त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)
सहा दिवसांपासून बँकेतील व्यवहार ठप्प
By admin | Updated: May 19, 2014 23:47 IST