घोराड : तालुक्यात रस्त्याला जागोजागी खड्डे पडले आहे. पण डांबरीकरणाच्या रस्त्यावरील खड्ड्यांची मुरूमाद्वारे मलमपट्टी केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. यामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे.खडी व डांबराद्वारे अनेक वेळा खड्ड्यांची डागडूजी बांधकाम विभागाद्वारे करण्यात आली. पण वारंवार खड्डा उखडल्या जात असल्याने डांबरीकरणाच्या रस्त्याला मुरूमाचा मुलमा दिला जात आहे. पण डांबरीकरणच टिकले नाही तर मुरुमाद्वारे बुजविलेला खड्डा कसा बुजणार असा प्रश्न या मार्गावरील प्रवासी व्यक्त करीत आहे. घोराड येथून खापरी गायमुख जाणारा रस्ता असला तरी तो जुनगड, हिंगणा, नागपूरला जातो. घोराड पासून १ किमी अंतरावरील रस्त्यावर २०११ मध्ये २० लक्ष रुपये खर्च करण्यात आले. अवघ्या तीन वर्षात या रस्त्याला खड्डे पडले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने मुरूम टाकणे सुरू असून यातच खड्डेही बुजविले जात आहे. तसेच सेलू वडगाव झडशी, वर्धा नागपूर मार्गावर तसेच अनेक रस्त्यावर मुरूमाने खड्डे बुजविणे चालू आहे. सध्या पावसाने दडी मारली अहे. त्यामुळे हा मुरूम टिकून आहे. पाऊस येताच हे खड्डे पूर्वीप्रमाणेच उघडे पडणार आहे. मुरुमाचा चिखल पसरुन अपघात होण्याची शक्यता ही जास्त आहे. या खड्ड्याची डागडूजी डांबरीकरणानेच करावी, सध्या पाऊस नसल्याने लवकरात लवकर पूर्ण रस्त्याचे काम करावे व पुढे होणारे अपघात टाळावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी तसेच या मार्गाने नियमित प्रवास करीत असलेले प्रवासी करीत आहे.(वार्ताहर)
डांबरीकरणाच्या रस्त्याला मुरूमाची मलमपट्टी
By admin | Updated: August 17, 2014 23:21 IST