वर्धा : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात ८-१० वर्षांपासून विविध पदांवर अत्यंत तुटपूंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहे. विविध मागण्यांबाबत या कर्मचाऱ्यांनी आंदोलने केली; पण शासनाने लक्ष दिले नाही. यामुळे पुन्हा लक्ष वेधण्याकरिता बुधवारी काळ्या फीती लावून काम करीत निषेध नोंदविण्यात आला.सदर कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कामकाज असते. या अनुभवाचा विचार करून तसेच त्यांची नियुक्ती शासनाच्या सरळ सेवा भरतीच्या मानांकनानुसार झाली असल्याने रिक्त जागेवर समकक्ष पदावर समायोजन करावे, अशी मागणी आहे. यासाठी संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला; पण कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता पुन्हा आंदोलनाचा मार्ग पत्करण्यात आला आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी बुधवारपासून काळ्या फिती लावून कामकाज करीत आहेत. ते ३१ आॅगस्टपर्यंत काळ्या फीती लावून काम करणार आहेत. बुधवारी जिल्हा तसेच तालुकास्तरीय आणि सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काळ्या फीती लावून शासनाचा निषेध नोंदविला.(कार्यालय प्रतिनिधी)
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांकडून काळ्या फीत लावून निषेध
By admin | Updated: August 25, 2016 00:36 IST