लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टरांचा सेवा देण्यास नकार असतो, त्यामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेची धुरा बीएएमएस डॉक्टरांनाच सांभाळावी लागत आहे. या कोरोनाकाळातही बीएएमएस डॉक्टरांचा रुग्णांना मोठा आधार मिळाला. परंतु आता आरोग्य विभागाने बंधपत्रित एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती केल्याने दोन वर्षांपासून अविरत सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांना कार्यमुक्त करण्यात आले. या निर्णयामुळे वर्धा जिल्ह्यासह राज्यात इतरत्र कार्यरत असलेल्या बीएएमएस डॉक्टरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील एमबीबीएस डॉक्टरांच्या जागा रिक्त राहत असल्यामुळे बीएएमएस डॉक्टरांची वर्षभराच्या करारावर नियुक्ती करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा डोलारा या बीएएमएस डॉक्टरांच्या खांद्यावर आहे. कोरोनाकाळातही हे बीएएमएस डॉक्टर दिवसरात्र रुग्णसेवा करीत आहे. परंतु आता आरोग्य विभागाने बंधनपत्रित एमबीबीएस डॉक्टरांची एक वर्षाकरिता नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे जिल्ह्यात १५ बंधपत्रिक एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आल्याने १५ बीएएमएस डॉक्टरांना अचानक ते कार्यरत असलेल्या आरोग्य केंद्र व उपकेंद्रातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. हीच अवस्था राज्यातील इतरही जिल्ह्यातील असल्याने बीएएमएस डॉक्टरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता इतर कार्यरत बीएएमएस डॉक्टरांचीही चिंता वाढली आहे.
एक वर्षानंतर पुढे काय?
आरोग्य संचालकांच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामध्ये बंधनपत्रित एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती केवळ वर्षभरासाठीच आहे. वर्षभरानंतर हे बंधपत्रित डॉक्टर उच्च शिक्षणाकरिता किंवा इतर कारणांकरिता निघून जाईल. त्यानंतर येथील आरोग्य सेवेचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाच्या आदेशाने गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत असलेले बीएएमएस डॉक्टरही कार्यमुक्त झालेत आणि बंधपत्रित एमबीबीएस डॉक्टरही वर्षभरानंतर निघून जाणार आहेत. त्यामुळे शासनाने याबाबत विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.
एमबीबीएस डॉक्टरांच्या सेवा पूर्ववत करा
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने वैद्यकीय अधिकारी गट-अ या पदावर कंत्राटी स्वरुपात बीएएमएस डॉक्टरांची सेवा घेण्यात आली. कोविड काळात दोन वर्षांपासून ते सेवा देत आहे. परंतु आरोग्य उपसंचालकांच्या आदेशाने बीएएमएस डॉक्टरांच्या सेवा समाप्त करून बंधपत्रित एमबीबीएस डॉक्टरांना नियुक्ती देण्यात आली आहे. आरोग्य केंद्रातील अनुभवी बीएएमएस डॉक्टरांना कार्यमुक्त केल्याने ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राच्या कामकाजावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे बीएएमएस डॉक्टरांची सेवा पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती मृणाल माटे यांनी पालकमंत्री सुनील केदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.