१०९ वर्षांची परंपरा : १९०५ मध्ये झाली स्थापना रितेश वालदे बोरधरणहिंगणी येथील कुंभारपूरा, आखाडा वॉर्ड नं. ३ मधील गणेशोत्सव हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहे. येथील बाल गणेश मंडळाला १०९ वर्ष पूर्ण झाले आहे. शतकोतर परंपरा असलेल्या या मंडळाच्यावतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. १९०५ मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली.हिंदू आणि मुस्लीम कार्यकर्त्यांच्या मंडळातून येथे जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न या मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे. मंडळाचे सर्वच मुस्लीम सदस्य सर्व कार्यक्रमाला हजर राहत असल्याचे दिसून आले आहे. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाला त्यांची असलेली उपस्थिती सर्वांना आकर्षित करणारी ठरत आहे. हिंंगणी येथील हे एकमेव गणेश मंडळ असून एक गाव एक गणपतीची संकल्पना येथे आजतागायत कायम आहे. हिंगणी येथे गत काही वर्षांपूर्वी बाल गोपालांनी एकत्र येवून गणेशाची मूर्ती स्थापन केली. तेव्हापासून कुंभारपूरा आखाडा येथील नारायण बोरसरे यांच्या घरी पारंपरिक पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. नारायण बोरसले यांच्या घराच्या परिसरात गणेशोत्सवासाठी करण्यात आलेली व्यवस्था आखाडा म्हणून ओळखली जाते. याच परिसरात असलेल्या कुंभार पुरा आखाड्याचे लोक वर्गणीतून काही वर्षांपूर्वी काम करण्यात आले. या मंडळात बाल गोपालकाचा मोठा सहभाग असतो. यामुळे या मंडळाला बाल गणेश मंडळ असे नाव अद्यापही कायम आहे. या मंडळाचे अध्यक्ष प्रशांत मुडे तर उपाध्यक्ष दिवाकर भोसले, गजानन वझे, शेख शाबीर, किशोर धाबडे, अमोल मुडे, भारत वझे, सतीश भजभुजे, अनिल मोहीजे, सतीश वाल्दे, शुभम किरडे, भारत किरडे आदींचा समावेश आहे.गणेशोत्सवासाठी कार्यकर्ते व ग्रामस्थ एकत्रित येऊन सामाजिक एकोपा वाढीस लावण्याकरिता कार्यरत आहेत. या मंडळाचा १०९ वर्षांपासूनचा उत्साह आजही कायम असल्याचे विविध कार्यक्रमातून दिसत आहे. भाविक श्रद्धेने या बाल गणेशाला मनोमनी वंदन करीत असल्याचे चित्र आहे. दहा दिवस येथे जल्लोष पूर्ण वातावरण असते.
हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा जपणारे हिंगणीचे बाल गणेश मंडळ
By admin | Updated: September 26, 2015 02:10 IST