रेकॉर्ड चार्ज उपलब्ध नाहीवर्धा : शहरालगतच्या सावंगी (मेघे) येथील ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहाराचे लेखा परिक्षण गत सहा वर्षांपासून करण्यात आलेले नाही़ २००८ पासून याबाबत कुठलाही अहवाल प्राप्त होत नसल्याने आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता वर्तविली जात आहे़ यामुळे ग्रामपंचायतीचे लेखा परिक्षण करणे गरजेचे झाले आहे़सावंगी (मेघे) ग्रा़पं़ चे २००८ ते २०१४ पर्यंतचे लेखापरिक्षण करण्यात आलेले नाही. नियमानुसार प्रत्येक वर्षी लेखापरिक्षण करून त्याचा अहवाल कार्यालयाकडे पाठवावा लागतो़ २००८ ते २०११ पर्यंतचा रेकॉर्ड चार्ज ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे सादर केला नसल्याने याची चौकशी करणे क्रमप्राप्त ठरत आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांनी लेखी विचारणा केली; पण ही माहिती त्यांना सादर करण्यात आली नाही. यामुळे कागदपत्रे गहाळ केल्याचा संशय निर्माण होत आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी याबाबत विचारणा केली असता माहिती देण्यात टाळाटाळ केली जात आहे़ लेखापरिक्षण का केले नाही, याची उकल होत नसल्याने ग्रा़पं़ सदस्य व ग्रामस्थ यांच्यात असंतोष पसरला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमणूक करून दोषी व्यक्तींवर कारवाई करावी, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १७९ प्रमाणे फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़ ग्रामविकास अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड चार्ज मागितला असता तो देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे सांगितले जाते़ ग्रा़पं़ सदस्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे़ यात चौकशी व लेखा परिक्षणाची मागणी करण्यात आली आहे़ या प्रकरणी कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी ग्रा़पं़ सदस्य सदस्य मोरेश्वर पाटील, अमरजीत फुसाटे, उमेश जिंंदे, सरिता पारधी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते़(स्थानिक प्रतिनिधी)
लेखा परीक्षणास सहा वर्षांपासून बगल
By admin | Updated: January 1, 2015 23:08 IST