नामांकनाची शेवटची वेळ तरीही यादी नाही नामांकनपत्र सादर करण्याची अंतिम तारीख तोंडावर असताना अद्याप कॉँग्रेस, भाजपा या प्रमुख राजकीय पक्षासह कुठल्याही पक्षाने अद्याप पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा केली नसल्याने साऱ्यांना हुरहूर लागली आहे. पुलगावचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिला राखीव असल्यामुळे अनेक धुरंदराच्या तोंडचे पाणी पळाले; परंतु आपले राजकीय वर्चस्व राहावे यासाठी अनेकांनी आपल्या अर्धागिंनीसाठी उमेदवारी मागितली. यामुळे सर्वच राजकीय पक्षापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपामध्ये इच्छुकांनी रस्सीखेच सुरू आहे. भाजपाचे लक्ष नगर परिषदेवर केंद्रीत झाले असून निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या शोधात भाजपा आहे. जिल्हा सचिव नितीन बडगे व संजय गाते यांच्यासह विद्यमान नगरसेवक सुनील ब्राम्हणकर भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या उमा बियाला यांनीही पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मागितली असल्याचे समजते.कॉँग्रेस पक्षाने काही नावे पुढे केली असली तरी महिला कॉँग्रेसच्या अध्यक्ष रंजना पवार यांचे नाव आघाडीवर आहे. शिल्पा खत्री हे दुसरे नावही वेळेवर पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे असले तरी अधिकृत उमेदवारांच्या घोषणेकडे अनेकांचे लक्ष आहे.(तालुका प्रतिनिधी)
राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवारीकडे लक्ष
By admin | Updated: October 28, 2016 01:31 IST