शहर पोलिसात गुन्हा दाखलवर्धा : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या रविशंकर शिवचरण तिवारी (३७) रा. चंद्रपूर याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या मुख्यालय येथील कार्यालयात घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे वर्धेच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपूर येथील काळाराम मंदिर भागातील रविशंकर तिवारी याला ताब्यात घेतले. विचारपूस केली असता त्याने चोरीच्या गुन्ह्याची माहिती दिली. यावरून त्याला गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली. शुक्रवारी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या रविशंकर याने सकाळी ८ वाजताच्या सुमारास पोलिसांना शौचास जायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी शौचालयात नेले. दरम्यान आरोपी रविशंकर तिवारी याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना लक्षात येताच पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. घटनेची तक्रार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस कर्मचारी अशोक वाट यांनी शहर पोलिसात दाखल केली असून शहर पोलसांनी आरोपी रविशंकर तिवारी विरूद्ध गुन्ह्याची नोंद घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे. सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती पोलीस विभागाकडून सांगण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा एलसीबीच्या कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: October 3, 2015 01:49 IST