यशंवत झाडे : शेतकरी मेळाव्यात शेतकरी कर्जमुक्तीचा ठराववर्धा : देशभरांत शेती नफ्यात येत नाही म्हणून लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहे. विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्यांमध्ये आणखीच वाढ झाली आहे. उत्पादन वाढले, जास्त पिकले तर बाजारपेठेत शेतमालाचे दर पडतात. उत्पादन वाढले तरी उत्पन्न वाढत नाही. तेव्हा स्वामीनाथन कमिशनप्रमाणे शेतमालाचे हमी दर निश्चित करावे, असे प्रतिपादन समुद्रपूर येथील शेतकरी मेळाव्यात किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे यांनी केले. नापिकी झाली तर सरकार विदेशातून गहू, तांदूळ, डाळ याची आयात करून भाव पाडते. अशास्थितीत शेतकऱ्यांना वाढत्या महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे दरवर्षी शेतमालाचे हमी दर कृषी मूल्य आयोगाने पेरणीपूर्वी जाहीर करावे. ते दर बाजारपेठेत शेतकऱ्यांना मिळतील अशी व्यवस्था केंद्र व राज्य सरकारने करावी, असेही ते म्हणाले. समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा मेळावा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी बाळकृष्ण तिमांडे होते तर प्रमुख अतिथी मंचावर यशवंत झाडे, चंद्रभान नाखले, महेश दुबे, जानराव नागमोते, गजानन ढोरे, जगन चांभारे उपस्थिते होते. याप्रसंगी प्रमुख अतिथींनी शेतकरी समस्या व त्यावरील उपाय यावर समयोचित मार्गदर्शन केले. याप्रसंगी स्वामीनाथन कमिशनप्रमाणे शेतमालाचे दर केंद्र सरकारने जाहीर करावे व सर्व शेतकऱ्यांना कर्जमूक्ती द्यावी, असा ठराव महेश दुबे यांनी मांडला. त्याला जगन चांभारे यांनी अनुमोदन दिले. सदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. कार्यक्रमासाठी महेश चांभारे, विजय अवचट, रामभाऊ खेळकर, आनंदराव पिदुरकर, आत्माराम कोळसे, बिजाराम नेहारे, भास्कर डवरे, घनश्याम डफ, रमाकांत वैरागडे, बाबाराव वैरागडे आदिंनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनोद नगराळे यांनी केले.
स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतमालाला हमीभाव द्या
By admin | Updated: October 20, 2016 01:08 IST