समुद्रपूर : गत दहा दिवसांपासून गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शिवाय नगर पंचायत घोषित होऊन प्रशासकाच्या हातात कारभार गेल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. समुद्रपूर नगर पंचायत घोषित होऊन ग्रा.पं. बरखास्त करण्यात आली. संपूर्ण कारभार प्रशासकाच्या हातात देण्यात आला. यामुळे येथै अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. नळ योजनेमार्फत होत असलेला पाणी पुरवठा गत दहा दिवसांपासून बंद आहे. ऐन पावसाळ्यात नळाला पाणी येत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असताना प्रशासक गप्प असल्याचे दिसते. पावसाळ्यापूर्वी गावातील नाल्या उपसण्यात आल्या नाहीत. यामुळे नाल्या तुंबल्या असून पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय नाल्यांतील सांडपाणी तुंबल्याने डासांचा प्रादुर्भाव होत असून विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. नागरिकांच्या या समस्या सोडविण्याकरिता प्रशासकांनी त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, शहरात स्वच्छता मोहीम राबवून आजारांवर आळा घालावा, अशी मागणीही नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे.(तालुका प्रतिनिधी)
१० दिवसांपासून कृत्रिम पाणी टंचाई; महिलांमध्ये असंतोष
By admin | Updated: July 2, 2015 02:32 IST