फनिंद्र रघाटाटे रोहणालगतच्या वाई या गावातील रेणके भावंडांनी गोंधळाची परंपरागत कला आजही जोपासली आहे. लग्नप्रसंगी लग्नापूर्वी वर व वधूच्या घरी गोंधळाचा कार्यक्रम आयोजिला जातो़ मंगल प्रसंगांपूर्वी आपल्या मृतक पुर्वजांची आठवण करून त्यांना निमंत्रित करण्याची प्रथा मोठ्या श्रद्धेने पाळली जात आहे़ गोंधळ हा पारंपरिक कला प्रकार सादर करणाऱ्यांची संख्या फार कमी राहिली आहे; पण गोंधळाच्या कार्यक्रमातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून रेणके बंधू या कलेच्या जोपासनेकरिता झटत आहे.वाई हे आर्वी तालुक्यातील लहानसे गाव आहे. येथे गोंधळी समाजाची २५ घरे आहेत. कुणाच्याही घरी गोंधळ करायचा असेल तर त्यांची पावले वाई या गावाकडे वळतात. वाई येथील किसन मारोतराव रेणके, गोविंद हादवे व किरण रेणके यांनी ही परंपरागत आजही कला टिकवून ठेवली आहे. यामुळेच या कलावंतांना अनेक िदूरच्या गावांतून गोंधळ सादर करण्यासाठी बोलावणे येत असते. किसन रेणके हे तर वयाच्या नवव्या वर्षापासून गोंधळ सादर करीत आहेत़ बोटांच्या हालचालीवरून नाव ओळखण्याची कलाही त्यांनी अवगत केली आहे़ देवीचा जोगवाही ते सादर करतात़ ‘आम्ही देवीचे गोंधळी, गातो हरिनाम संभळी’, ‘दहा पाच घाला जेऊ, आम्ही गोंधळाला येऊ’, ‘उदो-उदो अंबाबाई’ हा त्यांचा जोगवा परिसरात प्रसिद्ध आहे. रेणके भावंडांनी पंढरपूर, चंद्रपूर, रायपूर, भिलाई येथेही गोंधळाचे सादरीकरण केले आहे. त्यांची संबळावरची थाप आणि देवीची आरती आजही रोमांचित करते!
‘ते’ दोघे जोपासताहेत गोंधळाची कला
By admin | Updated: January 17, 2015 02:19 IST