नाचणगाव ग्रा.पं. मालमत्ता जाळपोळ प्रकरणपुलगाव : नजीकच्या नाचणगाव येथील सरपंच सुनीता जुनघरे यांनी राजीनामा द्यावा, पोलिसांनी त्यांना अटक करावी या मागणीकरिता शिवसैनिकांनी ग्रा.पं. कार्यालयातील साहित्य रस्त्यावर आणून त्याची जाळपोळ केली. या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी चार शिवसैनिकांविरूद्ध गुन्हा दाखल केला. पैकी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची २० हजार रुपये दंड आकारत सुटका केली. या प्रकरणातील एक शिवसैनिक अद्याप फरार असल्याचे समजते.सरपंच सुनीता जुनघरे यांनी खोटे दस्तावेज सादर करून सरपंचपद प्राप्त केले. या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; पण पुढील कारवाई झाली नाही. यामुळे त्यांना निलंबित करून अटक करावी, अशी मागणी घटनेच्या तीन दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी केली होती. याबाबत कार्यरत ग्रा.पं. प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. निवेदन स्वीकारल्यानंतर ग्रा.पं. प्रशासनाने पोलीस संरक्षण मागणे गरजेचे होते; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, शिवसैनिकांनी मंगळवारी ग्रा.पं. कार्यालयात शिरून सरपंचाची खूर्ची, टेबल व इतर साहित्य रस्त्यावर आणून त्यांची होळी केली व पसार झाले. हा सर्व प्रकार झाल्यानंतर ग्रा.पं. सचिव अशोक बोबडे यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. या प्रकरणी पोलिसांनी शिवसेना जिल्हा उपप्रमुख आशिष पांडे, उपतालुका प्रमुख सतीश पेठे, माजी पं.स. सदस्य सतीश पाटील, प्रफूल्ल कुमरे यांच्या विरूद्ध भादंविच्या कलम ४५२, ४२७, ३४ अन्वये सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. यातील प्रफुल कुमरे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. निवेदन दिल्यानंतर ग्रा.पं. प्रशासनाने घटना टाळण्यासाठी पोलीस संरक्षण का घेतले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
तीन शिवसैनिकांची अटक व सुटका
By admin | Updated: April 8, 2016 02:02 IST