वर्धा: तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी पुलगाव शहरातील सील केलेल्या रेतीच्या साठ्याची विल्हेवाट लावली जात होती. याबाबत माहिती मिळाल्याने १५ टिप्पर रेती महसूल विभागाने गुरुवारी रात्री कारवाई करीत जप्त केली. यानंतर सर्व रेती सील केलेली असल्याने थेट फौजदारी कारवाई करणे अपेक्षित होते; पण तिसऱ्या दिवशीही या कारवाईला बगल देण्यात आली. यामुळे ‘सेटींग’साठी तर ही कारवाई लांबविली जात नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. शासनाकडून यावर्षी रेतीच्या साठवणुकीसाठी परवाने देण्यास मज्जाव करण्यात आला होता. असे असताना देवळी तालुक्यातील रेती माफीयाने मोठ्या प्रमाणात रेतीची साठवणूक केली. याची माहिती मिळताच तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी ३२ ठिय्ये सील केले. या साठ्यांवर कारवाईबाबत शासनाचे मार्गदर्शन मागविले होते. अद्याप मार्गदर्शन न मिळाल्याने रेतीचे साठे जैसे थे ठेवण्यात आले होते. सदर साठ्यातील रेती सील केलेली असल्याने तीची उचल करणे कायद्याने गुन्हा आहे. असे असताना साठ्यातील रेतीची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. या माहितीवरून देवळीचे प्रभारी तहसीलदार भागवत, प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी स्वप्निल तांगडे व कर्मचाऱ्यांनी पुलगाव येथे कारवाई केली. यात १५ टिप्पर, ट्रक जप्त करण्यात आले. रविवारी उपविभागीय अधिकारी घनश्याम भूगावकर यांनीही पुलगाव गाठून चौकशी केली. यानंतर रेती चोरीच्या प्रकरणात गुन्हे दाखल होणे अपेक्षित होते; पण अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. तहसीलदारांनी सील केलेली रेती असल्याने कुणीही तिची उचल करू शकत नाही वा कुणी त्या रेतीसाठी रॉयल्टीही देऊ शकत नाही. असे असताना संबंधित साठेधारकांनी रॉयल्टी बुक दाखवित प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला आहे. या कारवाईमध्ये जप्त केलेल्या टिप्परमधील रेती तीन साठे धारकांची असल्याचे समोर आले आहे. यामुळे थेट फौजदारी कारवाई अपेक्षित असताना अहवालाचा फार्स केला जात आहे. हा प्रकार केवळ सेटींगसाठी केला जात असल्याचा आरोप होत आहे. यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी लक्ष देत कारवाईचे निर्देश देणेच गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी) सध्या सुट्या असल्याने माझी कार्यालये बंद आहेत. कार्यालय सुरू झाल्यावर कारवाई केली जाणार आहे. - घनश्याम भूगावकर, उपविभागीय अधिकारी, वर्धा. मी चौकशीदार असल्याने स्वत: कारवाई करू शकत नाही. याबाबत अहवाल पाठवायचा आहे. निवडणुकीची कामे असल्याने अहवाल तयार करता आला नाही. २ नोव्हेंबरला अहवाल सादर करण्यात येणार असून उपविभागीय अधिकारी कारवाई करतील. - स्वप्निल तांगडे, प्रशिक्षणार्थी, उपविभागीय महसूल अधिकारी, देवळी.
रेती जप्तीमध्ये फौजदारी कारवाईला बगल
By admin | Updated: November 1, 2016 01:58 IST