कारंजा (घा़) : शासनाने अन्नसुरक्षा योजना अंमलात आणली़ यात सर्वांकरिता धान्य वितरणाची तरतूद करण्यात आली़ यानुसार एपीएल कार्ड धारकांनाही ११ किलो धान्य वितरित केले जाणार आहे़ जून महिन्यात एपीएल कार्डधारकांना ४ किलो तांदूळ ९.६० रुपये दराने तर ७ किलो गहू ७.२० रुपये दराने वितरित करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाचे सचिव गवई यांनी सांगितले़
जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई यांनी नुकतीच तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची सभा घेतली़ यात अन्नसुरक्षा योजनेबाबत माहिती देत धान्य वितरणाबाबत मार्गदर्शन केले. अन्नसुरक्षा ही योजना नसून कायदा आहे. त्यामुळे या कायद्यातील नियमांचे उल्लंघन होऊ न देण्याची काळजी स्वस्त धान्य दुकानदारांनी घ्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. तहसीलदार बालपांडे यांनी व्यावसायिकांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत धान्याची उचल करून तातडीने वितरण करण्याची सूचना यावेळी देण्यात आली. तालुक्यात अन्नपूर्णा योजनेंतर्गत १५५ कार्डधारक आहेत़
त्यांना पुरवठा विभागाद्वारे प्रतीकार्ड १० किलो धान्य विनामूल्य वितरित करण्यात आले आहे़ अंत्योदय कार्डधारकांना ३५ किलो धान्य वितरित होत असून त्यांची संख्या ४ हजार ७५८ आहे. ४४ हजार रुपयांदरम्यान उत्पन्न असणाऱ्या कार्डधारकांना प्रती माणसी ५ किलो धान्य तांदूळ, गहू मिळत आहे. एपीएल कार्डधारकांना प्रती कार्ड ११ किलो धान्य मिळते. अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या व इतर कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य न मिळाल्यास तहसील कार्यालयाच्या पुरवठा अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही सचिव गवई यांनी केले आहे. अद्यापही काही गावांत धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत़ धान्याची उचल महिन्याच्या अंतिम टप्प्यात केल्यानंतर, असे प्रकार घडत असल्याचे लक्षात येते. नागरिकांनी आपल्या हक्काच्या धान्यासाठी सजग राहणे व पुरवठा विभागानेही लक्ष देणे गरजेचे झाले आहे़(शहर प्रतिनिधी)