वर्धा : राज्य शासनाचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला. यात अंगणवाडी सेविकांना सन २०१४ मध्ये मंजूर झालेली मानधन वाढ ही एप्रिल २०१५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या निषेधात अंगणवाडी सेविकांनी काळ्या फिती लावून आंदोलन करणे सुरू केले आहे. यात शुक्रवारी दुपारी ३ वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला.शासनाने अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ९५० व मदतनिसांना ५० रुपयांची वाढ दिली होती. तसे आदेश ३० एप्रिल २०१४ रोजी निर्गमित झाले होते. ही वाढ १ एप्रिल २०१४ पासून लागू होणार असल्याचे यात जाहीर करण्यात आले होते. असे असताना त्यांना अद्याप ही वाढ मिळाली नाही. शिवाय आता अर्थसंकल्पात नव्याने या वेतनवाढीचे प्रयोजन अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. यात ही वेतनवाढ १ एप्रिल २०१५ पासून देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविकांवर हा अन्याय आहे. एक वर्षांची वेतनवाढ देण्यात यावी अशी मागणी करीत अंगणवाडी सेविकांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. २०१४ ची भाऊबीज भेट, आजारपणाच्या रजा, उन्हाळी सुट्या व एकात्मिक बाालविकास सेवा योजनेच्या निधीच्या कपातीचा निषेध करण्यात आला. याकडे दुर्लक्ष झाल्यास आयटक संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
अंगणवाडी सेविकांची निदर्शने
By admin | Updated: March 21, 2015 02:06 IST