वृत्ताची दखल : घर बांधकामाचा मार्ग झाला मोकळावायगाव (नि.) : सोनेगाव (बाई) येथील प्रमोद देवराव वरठी यांना इंदिरा आवास योजनेत घरकूल मंजूर केले. राहते घर पाडण्याचे आदेशही दिले; पण धनादेश वा रक्कम देण्यात आली नाही. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. वृत्त उमटताच सदर लाभार्थ्याला घरकुलाची रक्कम देण्यात आली. सोनेगाव येथील प्रमोद वरठी यांच्या नावाने १५ आॅगस्ट २०१५ रोजी इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर झाले होते. त्यांनी याबाबत ग्रामसेविका संगीता बोरकर व वरिष्ठ अधिकाऱ्यांना महत्त्वाचे दस्तावेज तसेच करारनामाही दिला. यानंतर त्यांना घर पाडण्याचे तोंडी आदेश देण्यात आले. यावरून वरठी यांनी राहते घर पाडले. त्या जागेवर संबंधित अधिकाऱ्यांनी प्लॉट पाडून देत चुन्याने ‘मार्किंग’ केले. ते ‘मार्किंग’ पूर्णत: मिटले; पण इंदिरा आवास योजनेचा धनादेश वा रक्कम देण्यात आली नाही. तीन महिन्यांपासून तो ग्रामपंचायत, पंचायत समितीचे उंबरठे झिजवत होता. निवासाची कुठलीही व्यवस्था नसल्याने त्याला दोन चिमुकल्या मुली व पत्नीसह थंडित उघड्यावर राहावे लागत आहे. याबाबत लोकमतने गुरूवारी वृत्त प्रकाशित केले. वृत्त उमटताच संबंधित अधिकाऱ्यांना जाग आली. लगेच जुन्या ‘फाईल्स’ काढत प्रमोद वरठी यांच्या बँक खात्यात ३५ हजार रुपयांचा धनादेश इंदिरा आवास योजनेच्या घरकुलसाठी जमा करण्यात आला. यानंतर पुन्हा ३५ हजार रुपयांचा धनादेश मिळणार असल्याचे सांगण्यात आले. उर्वरित रक्कम शौचालय व संपूर्ण बांधकामाअखेर मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.(वार्ताहर)
घरकुलासाठी दिली लाभार्थ्याला रक्कम
By admin | Updated: December 23, 2015 02:49 IST