वर्धा : शिकत असताना विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव असू द्यावी. यामुळे आव्हान पेलण्याची ऊर्जा प्राप्त होते. नवीन पिढीत आव्हाने पेलण्याची क्षमता कमी होत असल्याचे बोलले जाते. याकरिता त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संघर्षमय जीवन चरित्र वाचावे. यानंतर आत्महत्येचा विचारही त्यांच्या मनात येणार नाही, असे प्रतिपादन अधीक्षक अभियंता प्रशांत जनबंधू यांनी केले.वर्धा जिल्हा बामसेफ व अरहंत बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. इयत्ता दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रम स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात सोमवारी पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी धनराज तेलंग यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता जनबंधू तसेच महिला बालकल्याण अधिकारी मनिषा कुरसंगे, युनियन बँकेचे व्यवस्थापक ए. के. खोब्रागडे, तरुण उद्योजक अमोल मेश्राम, सामाजिक संस्थेचे नंदकुमार धाबर्डे, संयोजक प्रमोद जगताप प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी दहावीतील ४६ तर बारावीतील १८ विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या पालकांच्या पाल्यांना विशेष आर्थिक सहकार्य करण्यात आले.यावेळी बोलताना तेलंग म्हणाले की, शासनातर्फे व्यावसायिक आवड व कल यांची चाचणी घेतल्या जाते. विद्यार्थ्यांनी यानुसार आवडीच्या क्षेत्राकडे वळलात तर कमी वेळात निश्चित ध्येय गाठले जाईल. त्यासाठी सकारात्मक विचाराची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. मनिषा कुरसंगे यांनी उज्वल यशासाठी पारंपारिक क्षेत्रापेक्षा नवनविन आव्हानात्मक क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन केले. तर अमोल मेश्राम यांनी उद्योगात यशस्वी होण्याच्या गुजगोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या. धाबर्डे यांनी समाजऋण याबद्दल समायोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अध्यापक गौतम पाटील यांनी केले. प्रास्ताविक मोहन राईकवार यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. प्रकाश गोडघाटे यांनी मानले. आयोजनाला माया जगताप, प्रकाश कांबळे, देवानंद थुल, आशिष जगताप, भारत मून, अविनाश अंबोरे, सुमेध जगताप, इंजि. प्रकाश भगत, ओंकार मेश्राम, शुभम जगताप, चंद्रशेखर वानखेडे, सिद्धार्थ मून, श्रीरंग जगताप, अरविंद खैरकर, प्रणाली जगताप, प्रफुल उमरे, श्वेता जगताप, सुषमा पाखरे आदींनी सहकार्य केले. यावेळी पालक उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)
आंबेडकरांचे जीवनचरित्र विद्यार्थ्यांकरिता प्रेरणादायक
By admin | Updated: September 5, 2014 00:01 IST