वर्धा : बालकांना खेळता, बागडता यावे, वृद्धांना फिरण्या व बसण्यासाठी हक्काचे स्थळ असावे म्हणून शहरांत बाग-बगिचांची निर्मिती केली जाते़ वर्धा शहरातही अनेक ठिकाणी बालोद्याने निर्माण करण्यात आलीत़ यासाठी मोठी जागा आणि पैसाही खर्ची घालण्यात आला; पण त्या बालोद्यानाच्या देखभाल, दुरूस्तीसाठी कुठल्याही उपाययोजना नाहीत़ यामुळे आज शहरातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान मुलांसाठी की जनावरांसाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ अद्यापही या बालोद्यानाकडे पालिका प्रशासनाने लक्ष दिल्याचे दिसत नाही़शहरातील बसस्थानक ते सेवाग्राम मार्गावर डॉ़ बाबासाहेब आंबेडकर बालोद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे़ नगर परिषदेने या बालोद्यानात खेळसाहित्य, कारंजे बसविले़ फुलझाडे लावून बालोद्यान सुशोभित करण्याचा प्रयत्न केला़ या बालोद्यानात दोन ठिकाणी कारंजा लावण्यात आले होते़ शिवाय सर्वच प्रकारचे खेळ साहित्यही बसविण्यात आले होते़ शिवाय वृद्धांकरिता बाकांची तसेच जमिनीवर निवांत आराम करता यावा म्हणून लॉनमध्ये वापरले जाणारे गवतही लावण्यात आले होते़ काही वर्षे हे बालोद्यान एका संघटनेला देखभाल-दुरूस्तीसाठी हस्तांतरीत केले़ अनेक वर्षे सदर संघटनेने बालोद्यान सुस्थितीत ठेवले; मात्र छोट्याशा कारणावरून पालिकेने ते कंत्राट संपुष्टात आणले़ तेव्हापासून बालोद्यान मद्यपि, अवैध व्यावसायिक आणि अनैतिक कामांच्या हवाली केल्याचे दिसून येत आहे़ आंबेडकर बालोद्यानाचे गेट नेहमी बंद राहत असले तरी आतमध्ये शिरण्याकरिता एक नव्हे तर अनेक मार्ग आहेत़ बालोद्यानाला असलेले तारांचे कुंपण कित्येक ठिकाणी तुटलेले आहे़ जनावरे या बालोद्यानात चारली जातात़ गाई, म्हशी, बकऱ्यांसह लगत नाला असल्याने वराहांचाही सुळसुळाट असतो़ बालोद्यानातील खेळ साहित्य भंगार झाले आहे़ साहित्याची मोडतोड झाली असून बाक नाहिसेच झाले आहेत़ पाण्याचे कारंजे होते की नव्हते, हेदेखील कळायला मार्ग नाही़ बालोद्यानात सर्वत्र झाडे-झुडपे वाढली असून खेळ साहित्यालाही झुडपांचा विळखा आहे़ बालोद्यानाच्या दोन्ही बाजूला नाला असल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली असते़ मुख्य मार्गावर दुकाने असून ट्रॅव्हल्स उभ्या करण्याकरिता ती जागा देण्यात आली आहे़ यामुळे दिवसभर वाहनांची गर्दी असते़ परिसरातील नागरिक मुतारी म्हणून बालोद्यानाचा वापर करताना दिसून येतात़ अनेक वर्षांपासून नागरिकांद्वारे ओरड होत असताना पालिका प्रशासनाने त्याकडे लक्ष देण्याचे सौजन्य दाखविले नाही़ यामुळे बालकांचा हिरमोड होताना दिसतो़(कार्यालय प्रतिनिधी)
आंबेडकर बालोद्यान मुलांसाठी की गुरांसाठी?
By admin | Updated: October 26, 2014 22:45 IST