वर्धा : अतिसारामुळे बालकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम तसेच कूपोषण थांबविण्यासाठी अतिसार नियंत्रण पंधरावाडा आयोजित करून प्रत्येक घरात (ओआरएस) क्षार संजीवनी प्रात्यक्षिक पंधरवाडा राबविण्यात आला़ या उपक्रमांतर्गत १ लाख ४६ हजार क्षार संजीवनीची पाकीटे वाटप करून त्याच्या प्रभावी उपचाराबद्दल माहिती दिली जात आहे़अतिसारामुळे ० ते ५ वर्षे वयोगटातील मुलांना होणारे आजार, बालमृत्यू व कूपोषण थांबविण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ५ वर्षांपर्यंतच्या १ लाख १७ हजार मुलांपर्यंत क्षार संजीवनी पोहोचवून त्याच्या वापराबाबत बालकांना आरोग्य सेविका व स्वयंसेविकांमार्फत माहिती देण्यात येत आहे. बालकांच्या आरोग्याची काळजी घेताना नियमित हात धुवून बालकांचे संगोपण करावे हा उद्देशही या उपक्रमाचा असल्याची माहिती मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी यांनी दिली. अतिसार नियंत्रण पंधरावाडा १५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात राबविला जात असून, प्रत्येक घरी बालकांच्या आरोग्याबाबत माहिती दिली. त्यांना ओआरएस क्षार संजीवनी देण्यासह लहान मुलांना हगवणीचे आजार असल्यास घरात स्वच्छता ठेवणे, स्वच्छ अन्न शिजविणे, मुलांचा संडास धुतल्यानंतर हात धुण्याच्या सहा कृती करणे याचे प्रात्यक्षिकही या मोहिमेत दाखविण्यात येत आहे़ बाल आरोग्य तपासणी मोहिमेत ५९० बालकांना संदर्भसेवेची गरज लक्षात घेत आरोग्य सुविधा पुरविण्यात आली असल्याची माहितीही चौधरी यांनी दिली.नैसर्गिक आपत्तीबाबत जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे़ सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्य केंदात साथीचे रोग आढळल्यास शीघ्र प्रतिसाद पथक तैनात असून आवश्यक औषधसाठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशासह आवश्यक सर्व औषधी उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्याेधन चव्हाण यांनी दिली़(कार्यालय प्रतिनिधी)
१़४६ लाखांच्या क्षार संजीवनीचे वाटप
By admin | Updated: September 5, 2014 00:00 IST