हिंगणघाट : तालुक्यातील सावली (वाघ) महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या कडाजना येथे सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत शिबिर घेण्यात आले. यात एक हजार ६७३ लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी भुगांवकर, जिल्हा पुरवठा निरीक्षण अधिकारी सवाई, सावली (वाघ) सरपंच कापसे, कडाजना सरपंच मंजुळा धोटे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रमणी भगत, पंचायत समिती सदस्य उषा नैताम व संबंधीत गावातील पोलीस पाटील उपस्थित होते. या शिबिराकरिता प्रत्येक ग्रामस्तरावर दवंडी देऊन लोकांना शिबिरासंबंधी सुचना देण्यात आली. सावली(वाघ) सर्कल अंतर्गत एकूण १९ गावे व सहा तलाठी साझे समाविष्ट करण्यात आलेली होती. सदर शिबिरात सहा तलाठी, १९ गावे व स्वस्त धान्य दुकानदार मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, संजय गांधी तसेच पुरवठा विभागाचे कर्मचारी, सेतू कर्मचारी, अर्जनविस, स्टॅम्प वेंडर याचा यात समावेश केला होता. या शिबिरात जातीचे दाखले, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी शोधणे, नवीन शिधापत्रिका देणे, दुय्यम शिधापत्रके देणे आणि नवीन शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे, शिधापत्रिकेतून नाव काढणे, शपथपत्रे आदी प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आले. कार्यक्रमाची रुपरेषा हिंगणघाट तहसीलदार यांनी विषद केली. या शिबिरात परिसरातील एक हजार ६७३ लोकांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. सदर प्रमाणपत्रांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराच्या आयोजनाला महसूल विभागातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)
सुवर्ण जयंती राजस्व अभियानात १ हजार ६७३ प्रमाणपत्रांचे वाटप
By admin | Updated: August 4, 2014 23:54 IST