लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी तालुक्याच्या हिवरा (तांडा) येथील महिलेचा स्वॅब अहवाल मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. आरोग्य विभागाने महिलेच्या परिवारातील सदास्यांसह संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीकरिता पाठविले. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला. पण, संपर्कातील सर्वांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ तर, मृत महिलाच ‘पॉझिटिव्ह’ कशी? असा नवा प्रश्न वर्धेकरांनी उपस्थित केला. त्यामुळे ‘लोकमत’ लक्षात घेऊन त्यांच्या प्रश्नांचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून उत्तर देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न.लॉकडाऊनच्या दीड महिन्याच्या कालावधीत ग्रीन झोनमध्ये राहिलेला जिल्ह्यात १० मे रोजी मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ऑरेंज झोनमध्ये गेला. प्रशासनाकडून तत्काळ मृताच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु केला. हिवरा गावासह तीन किलो मीटर परिसरातील १३ गावे सील केली. महिलेच्या संपर्कातील २८ व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. तेव्हापासून साऱ्यांच्या नजरा अहवालावर खिळल्या होत्या पण, बुधवारी २८ व्यक्तींचेही अहवाल निगेटिव्ह आल्याने वर्धेकरांनी सुटकेचा श्वास घेतला. तेव्हापासून आता महिलेच्या ‘पॉझिटिव्ह’ आणि संपर्कातील व्यक्तींच्या ‘निगेटिव्ह’ अहवालाबाबत शंकाकुशंका उपस्थित होऊ लागल्या. त्या सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हायरल व्हायला लागल्याने त्यांच्या या शंकांवर वैद्यकीय तज्ज्ञांच्या मताने पांघरुन पडेल, अशी अपेक्षा आहे.गावातील हालचालीवर ‘तिसरा डोळा’, आठ हजारांवर नागरिकांच्या तपासणीला गतीआर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) या गावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाकडून उपाययोजनांना गती दिली आहे. या गावाच्या तीन किलो मीटर परिसरातील १० तसेच बफर झोनमधील ३ गावांचा समोवश आहे.मृत महिलेच्या जवळच्या ११ नातेवाईकांना आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले. यासोबतच ४९ व्यक्तींना हैबतपूर येथील समाजकल्याण वसतिगृहात तर २४ व्यक्तींना शासकीय तंत्रनिकेतनमध्ये संस्थात्मक विलगिरणात ठेवण्यात आले आहे. कमी संपर्कातील ८५ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले.प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या दहा गावांमध्ये २५ चमुंच्या माध्यमातून प्रत्येक घरी आरोग्य तपासणी करीत आहे. या परिसरातील ८ हजार २५ लोकांची तपासणी करुन सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास असलेल्यांना वेगळे काढून योग्य उपचार दिले जात आहे.यासह हिवरा (तांडा) या गावातील व्यक्तींच्या प्रत्येक हालचालीवर प्रशासनाचा ‘तिसरा डोळा’ लक्ष ठेऊन आहे. या गावावर दररोज दहा ड्रोन कॅमेरे घिरट्या घालत असून गावातील प्रत्येकावर प्रशासनाचा बारीक वॉच आहे. त्यामुळे कोण कुठे जातो, कुणाच्या संपर्कात येतो, याची सर्व माहिती प्रशासनाला मिळत आहे.वैद्यकीय तज्ज्ञ : रोग प्रतिकार शक्तीच महत्त्वाचीकोरोनाबाधित मृत महिलेला आजाराची कधी लागण झाली, त्यानंतर तिच्या संपर्कातील, परिवारातील व्यक्तींनी काय खबरदारी घेतली, तिला दम्याचा आजार किती दिवसांपासून होता, याची सखोल माहिती घेतली जात आहे. दम्याच्या आजारामुळे महिलेची रोगप्रतिकार क्षमता कमी झाली असावी. परिवारातील सदस्यांनी या काळात खबरदारी घेतली असल्याने किंवा त्यांची रोगप्रतिकार क्षमता जास्त असल्यामुळेच त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असेल, असा प्रकार चंद्रपूरसह इतर जिल्ह्यांमध्येही घडला आहे. तरीही १४ दिवस त्यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष असणार आहे.डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धामृत महिलेला दम्याचा आजार किती दिवसांपासून होता, तिला त्याचा काय त्रास होता, त्या त्रासामुळे परिवारातील सदस्य काय खबरदारी घेत होते, ही बाब महत्त्वाची आहे. दम्याचा आजाराने आधीच रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्याने ती कोरोना पॉझिटिव्ह आली असावी. परिवारातील सदस्य तिच्या आजारामुळे आधीच खबदारी घेत असल्याने किंवा त्यांची रोगप्रतिकार क्षमता चांगली असल्याने त्यांचा फारसा संपर्क आला नसल्यामुळे ते निगेटिव्ह आले असेल. तरीही त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांची पुन्हा तपासणी केली जाईल.डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धारोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांवर कोणत्याही आजाराचा लवकरच अटॅक होतो. हिवरा (तांडा) येथील महिलेची प्रतिकारशक्ती कमी व आधीच असलेल्या दम्याच्या आजारामुळे तिला कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन मृत्यू झाला असावा. परिवारातील व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्याने त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असावा. बरेचदा निगेटिव्ह व्यक्तींचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह येण्याचीही शक्यता असते.डॉ. सचिन पावडे, बालरोग तज्ज्ञ, वर्धाखबरदारी घ्या, धोका अद्याप टळला नाही!कोरोना आजाराची लक्षणे तत्काळ दिसत नाही, त्यामुळे १४ दिवस क्वारंटाईन ठेवले जाते. हिवरा (तांडा) येथील प्रकरणात मृत महिलेच्या परिवारातील सदस्यांसह संपर्कातील २८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करुन त्यांच्यावर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेऊन आहे. पहिल्या तपासणी अहवालावरुन तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी, या १४ दिवसाच्या कालावधीत त्यांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मुंबई, पुणे व नागपूर या ठिकाणे असे झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे अद्यापही १४ दिवसांपर्यंत धोका कायम असल्याने प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे.
सर्वच निगेटिव्ह; महिलाच पॉझिटिव्ह कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST
लॉकडाऊनच्या दीड महिन्याच्या कालावधीत ग्रीन झोनमध्ये राहिलेला जिल्ह्यात १० मे रोजी मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ऑरेंज झोनमध्ये गेला. प्रशासनाकडून तत्काळ मृताच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु केला.
सर्वच निगेटिव्ह; महिलाच पॉझिटिव्ह कशी?
ठळक मुद्देवर्धेकरांचा सवाल : वैद्यकीय तज्ज्ञांकडून मिळाले उत्तर, खबरदारी घेण्याची नितांत गरज