तळेगाव (श्या़पं़) : वाघोलीलगत झोपडपट्टीत अवैध दारूविक्रीला उधान आले आहे़ महिला व युवतींना याचा त्रास होत होता़ यामुळे महिलांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत दारूबंदीसाठी एल्गार पुकारला आहे़ वाघोलीलगत झोपडपट्टीत अवैध दारूचे अड्डे आहेत. गावठी दारू विक्रीचा व्यवसाय तेथे राजरोसपणे सुरू असल्याने खडकी, परसोडा, किन्हाळा, सिरसोली येथील मद्यपि तेथे येऊन मद्यपान करतात व धुमाकूळ घालतात. याचा त्रास तेथील महिला व शाळेत जाणाऱ्या मुलींना होतो़ नागरिक, महिलांनी दारूविक्रेत्यांना हटकले तर अश्लील शिवीगाळ केली जाते़ शिवाय आमचे कुणीच काही वाकडे करू शकत नाही, अशी मुजोरी करतात. पोलीस एखादवेळी कारवाई करतात; पण दारूविक्री पुन्हा जैसे थे होते़ आता तेथील नागरिकांनी व महिलांनी एक पाऊल पुढे टाकून जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे. यात गावातील चार दारूविक्रेत्यांच्या नावांसह यादी देत त्यांच्या विरूद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. शिवाय मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांनाही निवेदनाची प्रत देत गावात संपूर्ण दारूबंदी व्हावी, अशी मागणी केली आहे़ ग्रामस्थांच्या सह्या व ग्रा.पं.च्या ठरावासह हे निवेदन देण्यात आले़ यानंतर विजयानंद डमके, सहादेव कुरवाडे, श्याम वानखडे, रामदास कुरवाडे, अरुण राऊत, गजानन धावट, सुनीता मुदेकार, रत्ना बाळकर, वनीता राऊत, संगीता कुरवाडे, वनीता पानबुडे, अर्चना हुके, या महिला-पुरूषांनी दारूबंदी मंडळ स्थापन करून गाव दारूमुक्त करण्याचा निर्धार केला आहे.(वार्ताहर)
मद्यपि व दारूविक्रेत्यांचा धुमाकूळ; गावकरी त्रस्त, महिलांनी पुकारला एल्गार
By admin | Updated: November 23, 2014 23:25 IST