लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : खरीप किंवा रब्बी हंगामाच्या सुरुवातीला बनावट बियाणे, खत तसेच कीटकनाशकाची विक्री करणारे सक्रिय होतात. पण जिल्ह्यातील कुठल्याही शेतकऱ्याची या प्रकरामुळे फसवणूक होऊ नये म्हणून म्हणून कृषी विभाग अलर्ट मोडवर येत भरारी पथकाच्या माध्यमातून पडताळणी करते. बनावट खत, बियाणे तसेच कीटकनाशकाची विक्री करणे हा कायद्यान्वये गुन्हा असून यंदाच्या वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत कृषी विभागाने तब्बल २४ विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावला आहे. बनावट बियाणे, खत तसेच कीटकनाशक विक्रीच्या प्रकाराला आळा बसावा म्हणून यंदाच्या वर्षी बियाण्यांचे ५१८ नमुने, खताची ३०८ नमुने तर कीटकनाशकांची तब्बल १२३ नमुने घेत ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याच्या कृषी विभागाला प्राप्त झाले. तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच जि.प. कृषी विभागाने यंदा बियाण्यांचे ५२२ नमुने, खताची २९७ नमुने तर कीटकनाशकांची १२८ नमुने घेत ती तपासणीसाठी पाठविले आहे. कृषी विभागाकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान काही चुकीचे आढळल्याने जिल्ह्यातील २४ विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला आहे. यात २२ बियाणे तर दोन खत विक्रेते आहेत.
न्यायालयात १६६ प्रकरणे प्रलंबितऑक्टोबर अखेरपर्यंत एकूण १६६ प्रकरणे न्यायालयात निकालासाठी प्रलंबित आहेत. यात बियाण्यांशी संबंधित १०५, खतांशी संबंधित ४४ तर कीटकनाशकांशी संबंधित १७ प्रकरणे असल्याचे सांगण्यात आले.
बोगस बियाण्यांबाबत प्राप्त झाल्या १८७ तक्रारीयंदाच्या वर्षी कृषी विभागाला बोगस बियाण्यांबाबत तब्बल १८७ तक्रारी प्राप्त झाल्यात. त्यापैकी १०० तक्रारींचा निपटारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आला आहे. तर उर्वरित तक्रारींचा लवकरच निपटारा हाेणार असल्याचे सांगण्यात आले.
बोगस बियाणे, खत तसेच कीटकनाशकाची जिल्ह्यात विक्री होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. यंदा जिल्ह्यात ऑक्टोबर अखेरपर्यंत बियाण्यांचे ५२२, खताची २९७ तर कीटकनाशकांची १२८ नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर तब्बल २४ विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला आहे.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.