रात्री १२ वाजता उघडले न्यायालयसमुद्रपूर : क्रांतीकारी शेतकरी महिला संघटनेच्या महिलांनी केलेल्या आंदोलनात सुमारे १०० आंदोलक महिलांना ताब्यात घेण्यात आले. महिलांना रात्रभर ठेवता येत नसल्याने पोलिसांच्या विनंतीवरून रात्री १२ वाजता न्यायालय उघडण्यात आले. महिलांना न्यायालयात हजर केले असता त्यांची पर्सनल बॉन्डवर मध्यरात्रीच्या सुमारास सुटका करण्यात आली.क्रांतीकारी शेतकरी महिला संघटनेच्या अध्यक्ष हेमा ठवरे यांच्या नेतृत्वात बुधवारी शेकडो महिलांनी जाम येथे रास्ता रोको आंदोलन केले. महिलांनी तब्बल १५ ते २० मिनीटांपर्यंत राष्ट्रीय महामार्गच रोखून धरला होता. आंदोलनाची तीव्रता आणि महिलांची संख्या लक्षात घेत वडनेर, हिंगणघाट, गिरड व समुद्रपूर येथील पोलिसांची कुमक बोलविण्यात आली होती. दरम्यान, आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता महिला कार्यकर्त्यांनी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यात पीएसआय तलीन यांची कॉलर पकडून हाताला ओरबडले, शितल यांची शर्टवरील नेम प्लेट तोडली, लिला व पायल यांच्या हाताला मार लागला. प्रतीभा, सुरेखा खापर्डे यांनाही मार लागला. यामुळे कठोर भूमिका घेत महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने आंदोलक महिलांना ताब्यात घेतले. दानव रा. जाम या महिलेने घटनास्थळावरून पळ काढला. क्रांतीकारी शेतकरी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून नागपूर ते चंद्रपूर महामार्ग रोखून धरला. मुंबई पोलीस अधिनियमाचे उल्लघंन करून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी गुन्हे दाखल करीत रात्री न्यायालयात हजर करण्यात आले. आंदोलक महिलांकरिता रात्री १२ वाजता न्यायालय उघडण्यात आले. पोलिसांची बाजू ऐकून घेत आंदोलक महिलांना पर्सनल बॉन्डवर मुक्त करण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)
आंदोलनकर्त्या महिलांची मध्यरात्री सुटका
By admin | Updated: June 10, 2016 02:19 IST