वायगाव (नि़) : स्थानिक ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आजगाव (जुने) येथे मोठ्या प्रमाणात दारूविक्री सुरू आहे़ अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना आता दारूबंदीसाठी पुरूषांसह महिलांनी पुढाकार घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले़ अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करा व गावात दारूबंदी करा, अशी मागणी महिलांनी लावून धरली़ यासाठी आजगावच्या महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, देवळी पोलीस ठाणे, दारूबंदी अधिकारी, वायगाव चौकी, ग्रा़पं़ प्रशासनाला सह्यांचे निवेदन दिले़आजगाव येथील अवैध दारूविक्री बंद करून दारू पुरवठा करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. दारू सहज मिळत असल्याने मद्यपि युवकांत वाढ होत आहे. यामुळे गावातील वातावरण दूषित होत आहे़ कामाला रोजमजुरीला जाणाऱ्या पत्नीच्या मजुरीच्या पैशातून दारू ढोसली जात असल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी जिल्ह्यात मटका, जुगार, अवैध दारूविक्री, अवैध वाहतूक यावर बंदी आणली होती. सर्व पोलीस ठाणेदारांना तसे निर्देश होते; पण सध्या पोलिसांनीच अवैध व्यावसायिकांनी सुट दिल्याचे दिसते़ सर्व अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचे दिसते़ देवळी पोलीस ठाण्यांतर्गत प्रत्येक गावात खुलेआम अवैध धंदे सुरू आहे. अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तळेगाव (टा.) येथे दारूबंदी करण्यात आली़ यामुळे गावात शांतता असल्याचे दिसते़ यामुळे येथेही दारूबंदी करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे़(वार्ताहर)
दारूबंदीसाठी आजगाव व कारलाच्या महिलांचा एल्गार
By admin | Updated: November 2, 2014 22:45 IST