रॅलीतही अॅम्बूलन्स : सणांच्या दिवसांत गल्लीबोळात वाजते सायरनवर्धा : गंभीर रुग्ण त्वरित रुग्णालयात पोहोचावा म्हणून रुग्णवाहिकांना परवानगी दिली जाते. उपप्रादेशिक परिवहन विभागही चांगल्या कामात अडथळे आणत नाही; पण गत काही दिवसांपासून खासगी रुग्णवाहिकांचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. गल्लीबोळात सायरण वाजवित फिरणे, खासगी कामांत सायरणसह रुग्णवाहिका वापरणे हे प्रकार वाढीस लागले आहे. रविवारी तर वर्धेत चक्क एका बाईक रॅलीचे नेतृत्वच सायरण वाजवित रुग्णवाहिकेने केले. हा प्रकार पाहून वर्धेकरांच्या भुवया उंचावल्या.रुग्णांची ने-आण सोपी व्हावी, रुग्ण शासकीय रुग्णवाहिकेवर अवलंबून राहू नये आणि वाहन न मिळाल्याने रुग्ण दगावू नये या प्रामाणिक हेतूने खासगी अॅम्बूलंसला परवानगी दिली जाते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयही चांगल्या कामात अडथळे आणत नाही. शासकीय नियमानुसार कागदपत्रे व रकमेची पुर्तता करताच रुग्णवाहिकांना परवानगी दिली जाते. नेमका याचाच फायदा खासगी रुग्णवाहिका धारक घेत असल्याचे दिसते. बहुतांश खासगी रुग्णवाहिका राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि संस्थांच्या असल्याचे पाहावयास मिळते. या रुग्णवाहिकांवर चालकाची नियुक्ती करून माफक शुल्क घेऊन रुग्णसेवा केली जाते. पक्ष, संस्थांच्या चांगल्या हेतूला बहुतांश रुग्णवाहिकांचे चालक मात्र हरताळ फासत असल्याचे दिसते. काही ठिकाणी खुद्द पदाधिकारी रुग्णसेवेच्या ‘नेक’ उद्देशाला तिलांजली देतात.रविवारी शहरात एका बाईक रॅलीचे आयोजन होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून ही बाईक रॅली काढली गेली. यातील वैशिष्ट्य म्हणजे, रॅलीचे नेतृत्व रुग्णवाहिकेकडे सोपविले होते. बाईक रॅलीच्या समोर रुग्णवाहिका होती. सदर रुग्णवाहिकेचे सायरण वाजवित चालक ती पळवत होता. वास्तविक, पदाधिकाऱ्यांनीच याला विरोध करणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही. रुग्णवाहिकेच्या मागेच पदाधिकारी, कार्यकर्ते बाईक घेऊन सहभागी झाले होते. हा पहिलाच प्रकार नव्हे तर अनेकदा खासगी रुग्णवाहिका सायरण वाजवित फिरताना दिसतात. राजकीय पक्षाच्या रुग्णवाहिकाही औचित्य नसताना सायरण वाजवित फिरताना दिसतात. पुलगाव येथे दसऱ्याच्या दिवशी रुग्णवाहिका गल्लीबोळात सायरण वाजवित फिरत होती. हा अॅम्बूलंसचा दुरूपयोग नव्हे काय, असा प्रश्न उपस्थित होतोय.(कार्यालय प्रतिनिधी)काय आहेत रुग्णवाहिकेचे नियम?रुग्णवाहिकेच्या वाहतुकीसाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. गंभीर रुग्णाला आणण्यासाठी जात असताना चालकाला गर्दीतून सायरण वाजवित वाहन काढता येते. वाहनामध्ये रुग्ण असल्यास चालकाला सायरण वाजविता येते. रुग्वाहिका रिकामी असताना आणि कुठल्याही रुग्णाला घ्यायला जायचे नसल्यास सायरण वाजविता येत नाही. रॅली, मोर्चे यात तर रुग्णवाहिकेचा वापरच करता येत नाही, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.वाहतूक पोलिसांचे दुर्लक्षशहरात रुग्णवाहिकांना रस्ता दिला जात नाही. रिक्त रुग्णवाहिका अकारण सायरण वाजवित फिरताना दिसतात; पण वाहतूक विभागाकडून कुठल्याही रुग्णवाहिकेवर कारवाई झाली नाही. याकडे वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्षच केले जात असल्याचे दिसते. याबाबत वाहतूक पोलीस निरीक्षक खारतोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी उत्तर देत नव्हता.
रुग्णवाहिकेच्या गैरवापरावर प्रशासन गप्पच
By admin | Updated: November 14, 2016 00:49 IST