वर्धा : खासगी अनुदानप्राप्त माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक सत्र २०१३-१४ च्या कर्मचारी संच निर्धारणाप्रमाणे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे अन्य शाळेत समायोजन प्रचलित निमयाप्रमाणे करण्यात यावे, अशी मागणी विमाशि संघाने एका निवेदनाद्वारे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे केली आहे.या निर्धारणाप्रमाणे शिक्षक मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरत असल्यामुळे या निर्धारणाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी शासन दरबारी शिक्षक संघटनांनी रेटून धरली आहे. या मागणीला शासनाने सहानुभूती दाखवित ज्या शिक्षणसेवकांच्या सेवा समाप्त होणार आहे, अशांना सेवा संरक्षणाबाबत आदेश देण्यात येईल, असे आश्वासन दिले असल्याची माहिती विमाशिने दिली आहे. विमाशि संघाने शिक्षकांचे समायोजन अन्य शाळेत करताना प्रचलित नियमाची अंमलबजावणी करून त्यांना सध्याच्या शाळेच्या जवळपासच्या शाळेत वा त्याच किंवा लगतच्या तालुक्यात करण्याची मागणी केली आहे. नियम डावलून शिक्षकांचे समायोजन केल्यास व तक्रारी प्राप्त झाल्यास विमाशिच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या मागणीसह अतिरिक्त शिक्षणसेवकांना शासन आदेश येईपर्यंत सेवेत कायम ठेवणे, शाळांचे नोव्हेंबर १४ चे वेतन देयके आॅनलाईन व आॅफलाईन पद्धतीने स्वीकारून वेतन अदा करणे, शाळांना रिक्त पदे भरण्यास नाहरकत प्रमाणपत्र देणे, मे १२ पूर्वी व नंतर नियुक्त झालेल्या शिक्षणसेवकांना डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिबिराचे आयोजन करून वैयक्तिक मान्यता प्रदान करणे, वैद्यकीस परिपूर्तीची देयके मंजूर करणे यासारख्या मागण्या मंजूर कराव्या, अशी मागणी विमाशि संघाच्यावतीने यावेळी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रचलित नियमाप्रमाणे करा
By admin | Updated: November 24, 2014 23:02 IST