ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. १५ - पाणी तापवताना आगीचा भडका उडून घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. ही घटना स्थानिक परदेशीपूरा भागातील स्वस्तिक कॉलनीत शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. जमखींना सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, स्वास्तिक कॉलनीतील सुरेश कुकेकर यांच्या घरी गत काही महिन्यांपासून गणेश अवचार हे भाड्याने राहतात. गणेश हा अल्पोहाराची हातगाडी लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. गणेश ची पत्नी वर्षा व साळी
मोना उर्फ माधुरी आत्रोजा या सकाळी ५ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरवर पाणी तापवत होत्या. अशातच काही कळायच्या आता अचानक आगीचा भडका उडाला. वर्षा व माधुरीने आरडा-ओरडा सुरू केली. प्रारंभी गणेश धावून आला. काही क्षणातच परिसरातील विकास गभणे, निलिमा पळसापुरे व गव्हाळे ही मंडळीही मदतीला धावून आली. पेट घेतलेले गॅस सिलिंडरला विझविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच भीषण स्फोट झाला. यामध्ये गणेश अवचार, मोना उर्फ माधुरी आत्रोजा, विकास गभणे, निलिमा पळसापुरे व गव्हाळे हे पाचही जण गंभीररित्या जखमी झाले.
स्फोट इतका भीषण होता की घराला व भिंतीला तडा गेल्या. जखमींना लगेच सावंगी (मेघे) रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच रामनगर
पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. काहीवेळातच नायब तहसीलदार डी. एस. राऊत, एस.एम. देशमुख, तलाठी सुनील ठाकरे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी करीत पंचनामा केला. घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी केली आहे.
दोन घरांचे नुकसान
घरगुती गॅस सिलिंडरने पेट घेतला तेव्हा घरात दोन महिलाच होत्या. महिलांनी आरडा-ओरड केल्यानंतर परिसरातील काहीजण त्यांच्या मदतीला धावले. पेट घेतलेल्या गॅस सिलिंडर व संसार उपयोगी साहित्यावर पाईपद्वारे पाण्याचा
मारा सुरू असतानाच गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की,
ज्या ठिकाणी कुकेकर यांच्या घरात अवचार राहतात त्या घराचे दार व खिडक्या पूर्णत: तुटून व भिंतींना तडा गेल्या. तसेच शेजारच्या कहाते यांच्या
घरालाही तडा गेल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. या घटनेत अवचार यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.
गॅस सिलिंडर एक दिवसांपूर्वीच आणले होते भरून
गणेशची पत्नी वर्षा व साळी मोना उर्फ माधुरी आत्रोजा या दोघींची नुकतीच प्रसुती झाली आहे. गुजरात येथील रहिवासी असलेली माधुरी प्रसुतीनंतर
वर्धेत आपल्या बहिणीकडेच थांबली होती. जवळपास ५ किलो वजनाचे पेट घेतलेले
घरगुती गॅस सिलिंडर शुक्रवारी गणेश अवचार याने भरून आणले होते. स्फोट झाल्यानंतर सदर गॅस सिलिंडरचे अक्षरश: तुकडे तुकडेच झाले. सदर घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जखमींना शासकीय मदत व नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.