हिंगणघाट : येथील वणा नदीच्या पात्रातून मशीनद्वारे रेतीचा उपसा करून अवैधरीत्या रेती वाहतूक करणारे तीन रेती भरलेले व नऊ रिकामे ट्रक जप्त करून ५७ हजारांचा महसूल सरकारी खजीन्यात जमा करण्यात आला. शनिवारी कार्डा घाटावर केलेल्या या धडक कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ माजली आहे.प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट उपविभागीय अधिकारी पदाचा प्रभार तहसीलदार दीपक करंडे यांच्याकडे आहे. ते दुपारी त्यांच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्गावरील उबदा गावाजवळील एका खदानीजवळ असताना दोन ट्रक रेती भरून येताना त्यांना दिसले. या ट्रकची चौकशी केली असता त्यांच्याजवळ रॉयल्टी नसल्याचे दिसून आले. यावरून त्यांची अधिक चौकशी केली असता वणा नदीकाठच्या औरंगपूर जवळच्या कार्डा घाटावरून रेती आणल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यामुळे तहसीलदार करंडे व तलाठी दाते यांनी मांडगाव नदीपलिकडे मनगाववरून कार्डाघाटावर धाड मारून सात ट्रक पकडले तर दुसऱ्या गटातील मंडळ अधिकारी विनायक उके, तलाठी गुलजार सिंग नकोटीया यांनी कार्डा घाटावर धाड टाकून तीन ट्रक पकडले. यापैकी सात ट्रक रिकामे होते. या सर्व जड वाहनांना हिंगणघाटच्या तहसील कार्यालय आवारात जमा करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)
कार्डा रेतीघाटावर कारवाई
By admin | Updated: May 18, 2015 01:58 IST