लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी जाम येथील सलमान शेख न्यायमत खाँ पठाण याला सबलीने मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीला समुद्रपूर पोलिसांनी अटक केली. त्याला रविवारी न्यायालयात हजर करून त्यांची दोन दिवसीय पोलीस कोठडी समुद्रपूर पोलिसांनी मिळविली आहे.शनिवारी सकाळी जाम येथील फकिर वाडी येथे घडलेल्या घटनेच्या काही वर्षांपूर्वी मृतक सलमान शेख न्यायमत खाँ पठाण याने एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला होता. त्या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली होती. कारागृहातून बाहेर आल्यावर सलमान शेख न्यायमत खाँ पठाण हा सदर अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांना या-ना त्या कारणाने वाकुल्या दाखवत होता. त्याच्या या कृत्याचा बदलाच सदर अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी घेतल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. शनिवारी घटनेनंतर काही तासातच आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. शनिवारी पंचनामा करताना समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळावरून रक्त मिश्रीत मातीचे नमुने घेवून ते चाचपडताळणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. शिवाय ज्या सळाखीने मारहाण करण्यात आली ती जप्त केली असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत.
‘त्या’ आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 22:27 IST
जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी जाम येथील सलमान शेख न्यायमत खाँ पठाण याला सबलीने मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीला समुद्रपूर पोलिसांनी अटक केली.
‘त्या’ आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी
ठळक मुद्देजाम येथील हत्या प्रकरण : मुलीवरील अत्याचाराचा बापाने घेतला बदला