जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : फटाका असो.चे निर्बंधासाठी साकडेपुलगाव : दीपावली म्हटली की, फटाक्यांची आतषबाजी आठवते; पण आता फटाक्यांच्या विक्रीमध्ये अनेकांनी उडी घेतली आहे. यात बहुतांश विक्रेत्यांकडे परवानेही आढळत नाहीत. शिवाय त्यांच्याकडून साठ्याचीही परवानगी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. या अवैध फटाका विक्रीमुळे अपघाताचा धोका बळावला आहे. याकडे लक्ष देत अवैध फटाके विक्रीवर निर्बंध लावावेत, अशी मागणी फटाका असोसिएशनने केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आले.दिवाळीसारखा मोठा सण दीपमाला, रोषणाई व फटाक्यांची आतषबाजी म्हणजेच दिवाळी. आबालवृद्धांसह सर्वांना फटाक्यांचा नाद असतो. या पर्वात विविध प्रकारचे फटाक्याची दुकाने लागतात. काही फटाके म्हणजे जवळपास स्फोटकेच असतात. ही स्फोटके मानवी जीवालाच नव्हे तर स्वत:सह इतरांच्याही जीवाला धोका निर्माण करणारे आहेत. यामुळे शासनाने अशा प्रकारच्या फटाक्यांवर काही निर्बध घातलेले आहेत. परवाना धारकांनीच फटाके विक्रीची दुकाने लावावीत, असे शासनाचे निर्देश आहेत; पण शहराच्या काही भागात आजही परवान्याशिवाय फटाके विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे. मानवी जीवन आणि मालमत्तेच्या सुरक्षेचा विचार करता शासनाने अशा फटाके विक्रीवर पायबंद घालवा, अशी मागणी फटाका असोसिएशनतर्फे करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)वाढत्या घटनांमुळे साठवणूक ठरतेय जीवघेणीदिवाळी सणामध्ये फटाक्यांची दुकाने लावण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून तात्पूरते परवाने दिले जातात. शिवाय फटाक्यांच्या साठवणुकीसाठी विविध अटींवर कायम परवानाही दिला जातो. यासाठी तशी व्यवस्था करणे गरजेचे असते; पण यासकडे कानाडोळा केला जात असल्याचेच दिसून येते. ही बाब पिपरी (मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कारला रोड येथील लक्ष्मी अपार्टमेंटमध्ये घडलेल्या घटनेवरून सिद्ध झाली आहे. आलमारीमध्ये ठेवून असलेल्या फटाक्यांनी पेट घेतल्याने घरालाच आग लागली होती. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने फटाक्यांची साठवणूक जीवघेणी ठरत आहे.