महावितरणचे दुर्लक्ष : नागरिकांमध्ये असंतोष, कार्यवाहीची मागणी आष्टी (शहीद) : पेठ अहमदपूर गावाला लागून आष्टी-परसोडा मार्गावरील डीपी उघडी आहे. या ठिकाणी लहान मुले लपवाछपवीचा खेळ खेळतात. यात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सदर डीपीचे दार त्वरित कुलूपबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आष्टी-परसोडा रस्त्यावर वीज वितरण कंपनीची डीपी आहे. बाजारे यांच्या शेताजवळ असलेल्या डीपीवर मोठ्या वाहिनीचे लोड आहे. डीपी बसविली तेव्हा त्याला कुलूप असलेले झाकण लावले होते; पण अद्याप इसमाने कुलूप तोडले. झाकणाचे कुलाबा कोंडाही तोडला आहे. आतमधील ग्रीपही काढल्या आहेत. जमिनीपासून दीड फुट अंतरावरच मोठ्या तारांचे रिंगण आहे. या तारा जिवंत असल्याने जीवितहानी होऊ शकते. गावाला लागून २०० मीटर अंतरावर डीपी असताना कुणी दखल घेत नाही. यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांप्रती संताप व्यक्त होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने लहान मुले, पाहुणे म्हणून मामाच्या गावाला आले आहे. यावर्षी गावरान आंबा चांगला आला. यामुळे लहान मुले आंबा खाण्यासाठी शेतात जातात. वाटेत कुठेतही लपाछपी खेळतात. यामुळे लपण्यासाठी या डीपीचा आधार घेतला जातो. वीज पुरवठा वेळोवेळी ये-जा करीत असल्याने काही मंडळी त्या ठिकाणी ग्रीप काढल्या तरी सरळ तार लावण्याचे काम करतात. अशात वीज आली तर मोठा अनर्थ घडू शकतो. याचे भान ठेवून वीज वितरण कंपनीने उघड्या डीपीचे दार त्वरित कुलूपबंद करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनातून केली आहे. आष्टी, नवीन आष्टी, पेठ अहमदपूर या तीनही ठिकाणी असलेल्या डीपीची अशीच अवस्था असल्याने सर्व पेट्यांना कुलूपबंद करण्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)
उघड्या डीपीमुळे अपघाताचा धोका
By admin | Updated: May 5, 2017 02:00 IST