पवनार : जनावरे कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात झाला. यात चार जनावरे गंभीर जखमी झालीत. ही घटना मंगळवारी रात्री कान्हापूर नजीक घडली. या वाहनाचा चालक फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.मंगळवारी सेलू येथील बैल बाजार असल्यामुळे तेथील खरेदी केलेल्या जनावरांची कत्तलखान्याकडे रवानगी केली जात होती. जनावरे घेवून जाणाऱ्या एम.एच.४९ डी. १४३९ क्रमांकाच्या या गाडीला कान्हापूर पवनारच्या दरम्यान अपघात झाला. या वाहनात एकूण पाच जनावरे होती. त्यापैकी चार गंभीर जखमी झाले व एकाला किरकोळ दुखापत झाली.जिल्ह्यात असलेल्या भिषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे पशुधन विक्रीस काढले आहे. याचाच फायदा घेऊन दलाल कमी किंमतीत जनावरांची खरेदी करून कत्तलखान्याकडे पाठवित आहेत. या वाहनात जनावरे अक्षरश: कोंबलेली होती. वाहनाला अपघात झाल्यानंतर गाडीचा चानक व सोबत असलेले पळून गेले.घटनास्थळी त्यांचे जॅकेट, कपडे, चादरी पडलेल्या होत्या. गंभीर जखमी झालेल्या गायींची रवानगी पशुवैद्यकीय रुग्णालयात करण्याकरिता बजरंग दलाचे बबलू राऊत व त्यांच्या सहकार्यांनी सहकार्य केले. सेलू पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनाममा केला. पुढील तपास पोलीस करीत असून अजूनपर्यंत कुणाला ताब्यात घेण्यात आले नाही.(वार्ताहर)
जनावरांना कत्तलखान्याकडे नेणाऱ्या वाहनाला अपघात
By admin | Updated: November 26, 2014 23:10 IST