हिंगणघाट : माध्यमिक शालांत परीक्षेचा पेपर देण्यासाठी दुचाकी ने जात असलेल्या विद्यार्थ्यांचा अपघात झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना डॉ. बी.आर.आंबेडकर विद्यालय परिसरात मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. मोहित सुनील पाखरानी (१७) असे मृतकाचे नाव आहे. तो सेंट जॉन हायस्कूलचा विद्यार्थी होता. पोलीस सुत्रांनुसार, मोहित हा त्याचा मित्र शुभम मोटवानी याच्या दुचाकी क्रमांक एम.एच.३२ व्ही.०५४५ ने परीक्षेला जात होता. मंगळवारी इतिहासाचा पेपर होता. दोघांना डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यालय हे परीक्षा केंद्र आहे. यावेळी शुभम गाडी चालवित होता. यावेळी त्याच लगत असलेल्या एक्टीवा गाडीचा धक्का लागल्याने दोघेही गाडीवरून खाली पडले. यात शुभमला खरचटले तर मोहित रस्ता दुभाजकावर आदळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. घटना स्थळावर उपस्थित असलेल्या काही युवकांनी मोहितला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातांनतर शुभमने पेपर सोडविला. या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
परीक्षेला जातांना अपघात विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Updated: March 18, 2015 01:55 IST